पुणे : नंजनगुडू श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे श्री राघवेंद्र स्वामी यांच्या ३५४व्या आराधना महोत्सवाची आज (दि. १२ ऑगस्ट) भव्य रथोत्सवाने भक्तीमय वातावरणात सांगता झाली.
महोत्सव दि. १० ते १२ ऑगस्ट या कालावधीत सदाशिव पेठेतील लक्ष्मी रस्त्यावरील श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे आयोजित करण्यात आला होता. श्री राघवेंद्र स्वामी महासंस्थानचे मंत्रालय (आंध्रप्रदेश) पिठाधीश्वर श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगलू नंजनगुडू यांच्या शुभआशीर्वादाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रथोत्सवाला श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठापासून सुरुवात झाली. लक्ष्मी रस्त्याने हा रथोत्सव असंख्य भाविकांच्या उपस्थितीत नगरकर तालिम चौकातून शनिपाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लिंबाजी महाराज विठ्ठल मंदिरात आला. येथे श्री राघवेंद्र स्वामी आणि भक्त प्रल्हादराय यांची भेट झाली. रथोत्सव कुमठेकर रस्त्याने मार्गस्थ होत खालकर मारुती येथे आला. येथे महाआरती होऊन रथोत्सवाची सांगता झाली. आकर्षक फुलांनी रथ सजविण्यात आला होता. सजावटीसाठी फुले बंगळुरू येथून आणण्यात आली होती. रथोत्सवापुढे भाविकांनी भक्तीगीतांवर ताल धरत ‘गोविंदा गोविंदा..’ असा जयघोष केला.
तीन दिवसीय उत्सवानिमित्त सुप्रभात सेवा, दुग्धाभिषेक, अलंकार, महामंगल आरती, अन्नदान सेवा, पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती मठाचे व्यवस्थापक दत्तात्रय जोशी यांनी सांगितली. या निमित्ताने मठातील वृंदावनास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

