जेधे सोशल वेल्फेअर फाऊंडेशन, इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे आयोजन
पुणे: जेधे सोशल वेल्फेअर फाऊंडेशन आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या वतीने यंदाही अभिनव बालगोपाळ सायकल दहीहंडीचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. १६) सकाळी ११.३० वाजता जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, शुक्रवार पेठ, पुणे येथे ही दहीहंडी बालगोपाळांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे. या सायकल दहीहंडीमध्ये २०० सायकल आहेत. दहीहंडी फोडल्यानंतर अतिदुर्गम भागातील १००, तर शहराच्या मध्यवस्तीतील १०० गरजू विद्यार्थ्यांना या सायकलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. बालगोपाळ सायकल दहीहंडीच्या माध्यमातून गरजू बालगोपाळांच्या जीवनात आनंदाचे क्षण भरविण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे, अशी माहिती उपक्रमाचे आयोजक पुनितदादा बालन आणि कान्होजी दयानंद जेधे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कान्होजी जेधे म्हणाले, “जेधे सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी अभिनव पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते. याआधी सायकल दहीहंडी, खेळण्यांची दहीहंडी आयोजित केली होती. त्यातून समाजाच्या वंचित घटकांतील मुलांना हजारो खेळण्यांचे वाटप केले होते. गेल्यावर्षीपासून इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पुनीत दादा बालन यांच्या सहकार्याने सायकल दहीहंडी घेतली जात आहे. यंदा या उपक्रमात भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील रायरी, सोंडे माथाना, कोंदवाडी, मेटपिलावरे, पाली बुद्रुक, वाजेघर बुद्रुक, लव्ही बुद्रुक, खेचरे, कळमशेत, बेलावडे, मांदेडे आणि बावीसमैल या अतिदुर्गम भागात वसलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांना व पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकली मोफत दिल्या जातील. श्री शिव छत्रपती मित्र मंडळ कार्यक्रमाचे संयोजक आहे. याप्रसंगी मृत्युंजय पथक आणि गणेशा वाद्य पथक यांचे ढोल-ताशा वादन होणार आहे.”

