आडकर फौंडेशनतर्फे कोमल पवार स्मृती पुरस्काराने पंकज मोदाणी यांचा सन्मान
पुणे : देशात अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होऊन पन्नास वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही आज समाजात पाहिजे तेवढ्या प्रमाणात अवयव दानाविषयी जागृती झालेली दिसत नाही. गरजू रुग्ण आणि अवयवदात्याची उपलब्धता यात मोठी तफावत आहे. या करिता अवयवदान विषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे काळाची गरज आहे. अवयवदान व प्रत्यारोपणाची अत्यंत खर्चिक असल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. ज्या योगे अवयव तस्करीला आळा बसण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आय. एम. ए.चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.
अवयवदानासाठी जनजागृती करणारे रिबर्थ फौंडेशनचे अध्यक्ष पंकज मोदाणी यांचा आडकर फौंडेशनतर्फे आज (दि. १२ ऑगस्ट) कोमल पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण आय. एम. ए.चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते राजेश शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रम झाला. अवयव दानाविषयी माहिती मिळाल्यानंतर उपस्थितांपैकी काही जणांनी अवयव दानाचा अर्ज देखील भरून दिला.
अवयवदानाविषयीची जनजागृती फक्त सुशिक्षित, उच्चवर्गीयांमध्ये न होता समाजातील सर्व स्तरात होणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगून डॉ. भोंडवे म्हणाले, अवयवदान म्हणजे मृतदेहाची विटंबना हा गैरसमज दूर करून अवयवदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात पुढे नेणे आवश्यक आहे. मेंदूमृत व्यक्ती, मृत व्यक्ती तसेच जीवंत व्यक्ती देखील अवयव दान करू शकते या विषयी देखील त्यांनी माहिती दिली.
सत्काराला उत्तर देताना पंकज मोदाणी म्हणाले, घरातील आजारापणामुळे अवयवदानाचे महत्त्व कळले, त्यानंतर या क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला. यातूनच रिबर्थ फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात केले जात आहे. ज्यात विविध रुग्णालये, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे, ग्रीन कॉरिडॉर मुव्ही कॉम्पिटिशनमध्ये सहभाग यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. कोमल पवार स्मृती पुरस्कार ही आमच्या संस्थेच्या कामाची फक्त पोचपावतीच नव्हे तर जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. हा पुरस्कार मी माझ्या मातोश्री तसेच रिबर्थ फाऊंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे.
अवयवदानाच्या जनजागृतीसाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, असे राजेश शेट्टी यांनी सांगितले.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती सांगितली. पुरस्काराच्या माध्यमातून अवयवदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन निरुपमा महाजन यांनी केले. मानपत्राचे लेखन प्रभा सोनवणे यांचे होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘पुनर्जन्म’ या विषयावर कविसंमेलन झाले. यात प्रभा सोनावणे, भारती पांडे, सुजाता पवार, ऋचा कर्वे, अनुराधा काळे, तनुजा चव्हाण, कपिल घोलप, प्रतिमा कुलकर्णी, स्वप्नील पोरे, प्रतिमा जोशी यांचा सहभाग होता.

