तर्पण फाउंडेशन तर्फे तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : अनाथांना महाराष्ट्रात १ टक्का आरक्षण सुरु आहे. यामुळे अनेक अनाथ मुलांना नोक-या मिळायला लागल्या. स्पर्धा परीक्षांची फी देखील कमी केली आहे. आता अनाथांना महाराष्ट्रात कोणत्याही कोर्सला शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झाला आहे. महिला बाल कल्याण विभागाकडे हे काम असून हा मोठा निर्णय झाला असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
तर्पण फाउंडेशन तर्फे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळा कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराच्या कमलनयन बजाज अतिथी गृहात पार पडला. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक आमदार श्रीकांत भारतीय, प्रकल्प संचालक ऊर्जा भारतीय, इस्कॉन पुणे चे उपाध्यक्ष रेवतीपती प्रभू, पुण्यातील संचालक संजय भोसले, अशोक गुंदेचा, जनार्दन चितोडे, राजेश मेहता, किशोर तळेकर, पुरुषोत्तम पाटील, शशिकांत जगदाळे, प्रविण पाटील, अनुप शहा आदी उपस्थित होते.
अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा गौरव तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. यावर्षी पुण्यातील विजय फळणीकर यांना ‘आपलं घरं’ संस्था, नाशिकमधील स्वामी नारायण मंदिराचे प.पू. माधव स्वामी महाराज आणि अमरावतीमधील गुंजन गोळे यांच्या ‘गोकुळाश्रम’ संस्थेला यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तर्पण फाउंडेशनचे संचालक उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, परमेश्वराने भेदभाव निर्माण केला नाही. मात्र, आपण जाती, पंथ, भाषा, उपासना पद्धती यावर भेदभाव निर्माण केला. हा समाज माझा आहे, दुस-याचे दु:ख आपले मानून तर्पण फ़ौउंडेशन सारख्या संस्था कार्यरत आहेत. हिंदू तत्वज्ञानात माणसाला कसे जगावे हे शिकविण्यात आले. माझ्या समाजाची काळजी मी करणे, हा धर्म आहे, हे स्वामी विवेकानंद यांनी शिकविले. हिंदवी स्वराज्य निर्माण करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान आहे. त्यांना जिजामातांनी घडविले. त्यामुळे त्यांचे कार्य आपल्याला आदर्शवत आहे.
डॉ.सुरेश गोसावी म्हणाले, बालसुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न मुलांसमोर असतो. त्यांना योग्य दिशा मिळाली तर त्यांचे आयुष्य चांगले घडू शकते. त्यांच्यासाठी काम करणारी ही संस्था आहे. ही संस्था आणखी मोठी व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
श्रीकांत भारतीय म्हणाले, तर्पण फाउंडेशन हे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अनाथ मुलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तर्पण फाउंडेशनचे संचालक आहेत. फाउंडेशन मार्फत अनाथ मुलांच्या शिक्षणाबरोबरच नोकरी मिळविण्यासाठी सुद्धा मदत केली जाते. शिक्षण आणि नोकरी झाल्यानंतर मुलांचे विवाह जुळविणे आणि थाटात लग्न लावून देण्याचे कार्यसुद्धा फाउंडेशन करते. त्यामुळे अश्याप्रकारे अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहित करण्याकरीता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो, असेही त्यांनी सांगितले.

