पुणे-स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नागपूर या महापालिकांनी सुद्धा हा आदेश दिला आहे. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते. आषाढी असेल, महाशिवरात्री असेल, महावीर जयंती असेल, अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस बंदी घातली जाते. आता देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत आहेत. आपल्या देशात, राज्यात काही जण शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत. आता तुम्ही कोकणात जर गेलात तर साधी भाजी करताना पण तिथे सुकट, बोंबील असलं काही त्यात घालतात. कारण, तो त्यांचा आहार आहे. त्यांचा आहार त्यांना घ्यायला बंदी घालणे हे बरोबर नाही, उचित नाही.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसपूर्ते किंवा काही दिवसांसाठी बंदी असेल तर लोक स्वीकारतात. परंतु, तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागलात तर उलट अवघडच आहे. ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो तेव्हा बकरा कापतात आणि साजरा करतात. लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत. परंतु, भावनेचा आणि श्रद्धेचा विषय जेव्हा येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या दृष्टीने बघावे. आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितले तर त्यांचा मोठ्या प्रमाणातला आहार हा मांसाहारच असतो.

