उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली १३ ऑगस्ट,२०२५ रोजी मुंबईत आयोजन
मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२५ : महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार, दि. १३ ऑगस्ट, २०२५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, मुंबईतील १३ झोन मधील ९३ पोलीस ठाण्यांच्या दक्षता समिती सदस्य प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत “रंगस्वर”, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा अॅड. राहुल नार्वेकर हे उपास्थित असतील व कार्यशाळेस मुंबई पोलीस उपायुक्त श्री. विवेक पानसरे, मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन संचालक श्री. महेश नार्वेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (बॉम्बस्फोट विरोधी पथक) श्री. सचिन गावडे उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
सदरची कार्यशाळा फक्त निमंत्रितांसाठीच आयोजित करण्यात आली असून, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षिततेसंबंधी पोलीस यंत्रणेची तयारी, आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती आणि स्थानिक समित्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

