पुणे -आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा नाही, असे विधान कॉंग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या भूमिकेसंदर्भात रमेश चेन्नीथला यांनी हे मोठे विधान केले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याची देखील शक्यता वर्तवली जात असून यावर देखील चेन्नीथला यांनी आपले मत मांडले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात रमेश चेन्नीथला यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही. तसेच आगामी निवडणुकीत आघाडी होऊ पण शकते किंवा नाही पण होऊ शकते असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.
रमेश चेन्नीथला म्हणाले, राज ठाकरे आमच्या महाविकास आघाडीमध्ये नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीची काही चर्चा झाली असेल तर ते आम्हाला माहीत नाही. दोन्ही भाऊ हात मिळवत असतील तर आम्हाला त्यात काही अडचण नाही. परंतु, महाविकास आघाडी संदर्भात आम्ही यावर पोलिटिकल अफेअर्स मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुण्यात कॉंग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवासी कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमात कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता फक्त ‘अॅक्शन अॅक्शन आणि अॅक्शन’ असे म्हणत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागण्याचे निर्देश दिले. तसेच आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास येईल, असा विश्वास सपकाळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

