१४ ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण सोहळा.
पुणे- उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘बिटीया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. या फेस्टिव्हलअंतर्गत निवडक चित्रपटांचे स्क्रीनिंग १० ऑगस्ट २०२५ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक सभागृह, कोरेगाव पार्क येथे पार पडले. या वेळी एकूण ३०० कलाकृतींची नोंदणी झाली होती. त्यापैकी परीक्षकांनी निवडलेल्या २५ कलाकृतींचे स्क्रीनिंग करण्यात आले, तर १७ कलाकृतींना पारितोषिक वितरणासाठी निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी ज्युरींमध्ये दिग्दर्शक-अभिनेत्री वृशा सेन-दाभोळकर, निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता विशाल गोरे, दिग्दर्शक-अभिनेता सचिन दानिया आणि दिग्दर्शक-संगीतकार जाहिर दरबार यांचा समावेश होता.
स्पर्धेत १ मिनिट ते ७ मिनिटांच्या शॉर्ट फिल्म्स तसेच स्वतंत्र कॅटेगरीत १ मिनिटांच्या सोशल मीडिया रील्स सादर करण्यात आल्या. समाजजागृती, सांस्कृतिक मूल्ये, सध्याची पिढी, पर्यावरण, वाहतूक, भ्रष्टाचार, महिला सक्षमीकरण, ‘से नो टू ड्रग्स’, ‘गुड टच – बॅड टच’, एड्स जनजागृती, ‘नो मीन्स नो’, हुंडाबळी, घरगुती हिंसा अशा विषयांवरील चित्रफितींना प्राधान्य देण्यात आले, तसेच इतर सर्जनशील व सामाजिक आशय असलेल्या कलाकृतींनाही उत्साहाने स्थान मिळाले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन हॉल, नवी पेठ येथे होणार आहे. माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, खासदार राजनी ताई पाटील, जॉइंट पोलीस कमिशनर रंजन शर्मा, माजी खासदार प्रदीपदादा रावत, अभिनेत्री स्मिता गोंदकर, सुहाना मसालाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल चोरडिया, सुर्यादत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे डॉ. संजय चोरडिया, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, दूरदर्शनचे माजी अतिरिक्त संचालक मुकेशा शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले आणि राज इम्पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज जैन राणावत हे मान्यवर या सोहळ्यात पाहुणे असतील.
या कार्यक्रमात तीन प्रमुख कॅटेगरींमध्ये सहा मुख्य पारितोषिके आणि दोन प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत. पारितोषिकांमध्ये रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि आकर्षक भेटवस्तूंचा समावेश असेल. मुख्य पारितोषिकांमध्ये कॅमेरा व स्मार्टफोन शॉर्ट फिल्म्स कॅटेगरीत – पहिला क्रमांक ₹२५,०००, दुसरा क्रमांक ₹१५,००० आणि तिसरा क्रमांक ₹९,००० असेल. रील कॅटेगरीत – पहिला क्रमांक ₹५,०००, दुसरा क्रमांक ₹३,००० आणि तिसरा क्रमांक ₹२,००० असा गौरव दिला जाईल, अशी माहिती ‘बिटीया फाउंडेशन’च्या संगीता तिवारी यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, या उपक्रमातून तरुणांना समाजातील ज्वलंत विषयांवर भाष्य करण्याची संधी मिळून, चित्रपटसृष्टीत करिअर घडविण्याची प्रेरणा मिळेल.

