श्री तुळशीबाग महागणपती सांस्कृतिक महोत्सवात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गायिका शैला दातार यांचा सन्मान
पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीची सुवर्णपाने ज्या मंडळींनी लिहिली त्यामध्ये श्रीनिवास खळे, सुधीर फडके आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा समावेश आहे. ही महाराष्ट्र संस्कृती व मराठी संगीताची त्रिमूर्ती आहेत. अध्यात्म आणि शास्त्रीय संगीत ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी असून संगीताबाबत महाराष्ट्र संस्कृती भाग्यवान आहे, असे मत विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे आयोजन करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गायिका शैला दातार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पं.ह्रदयनाथ मंगेशकर, अभिनेते मोहन जोशी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते.
यामध्ये ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना श्रीनिवास खळे यांच्या नावाने व गायिका शैला दातार यांना माणिक वर्मा यांच्या नावाने विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संवाद पुणे निर्मित ‘अमृतस्वर’ हा सांगितीक कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, आजची तरुणाई सांस्कृतिक कलेचा वारसा चालवत नाहीत, असे म्हणले जाते. मात्र तुळशीबाग गणपती मंडळातील तरुण कार्यकर्ते उत्तमपणे कार्य करीत आहेत. दरवर्षी उत्सवाची उंची वाढवत आहेत. तसेच वर्षभर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना अशोक पत्की म्हणाले, श्रीनिवास खळे, सुधीर फडके आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांची गाणी एकूण आम्ही मोठे झालो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. या सगळ्यांविषयी अनेक आठवणी आहेत. आज माझा सन्मान केला त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो. शैला दातार यांनीही तुळशीबागेविषयी अनेक आठवणी सांगितल्या. नितीन पंडित यांनी प्रास्ताविक केले.

