जगातील सर्वात मोठा एक्टॉपिक थायरॉईड ट्यूमर यशस्वीपणे रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला
पुणे, ऑगस्ट ११, २०२५ – एका दुर्मिळ आणि उच्च-जोखीम असलेल्या केसमध्ये, पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रगत रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ६२ वर्षीय महिलेच्या छातीतून आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्टॉपिक ट्यूमर — १७ x १२ x ११ सेमी आकाराचा आणि ८०० ग्रॅम वजनाचा — यशस्वीरित्या काढला. या ट्यूमरचे निदान दुर्मिळ एक्टोपिक थायरॉईड गोइटर म्हणून झाले. ही अत्यंत दुर्मीळ स्थिती आहे, जेथे थायरॉईड ग्रंथी (gland) चुकीच्या ठिकाणी विकसित होते आणि मानेतील सामान्य थायरॉईड ग्रंथीशी तिचा कोणताही संबंध नसतो. अशा केसेस अत्यंत असामान्य आहेत आणि १००,००० ते ३००,००० व्यक्तींपैकी फक्त एका व्यक्तीमध्ये दिसून येते. सह्याद्रि हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या बहुविद्याशाखीय टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या टीममध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विनोद गोरे, लॅपरोस्कोपिक व रोबोटिक सर्जन डॉ. संजय कोलते आणि डॉ. फुलचंद पुजारी, कार्डिओथोरेसिक सर्जन डॉ. स्वप्निल कर्णे, भूलतज्ञ डॉ. विकास कर्णे आणि डॉ. बालाजी मोमले यांचा समावेश होता. सुरक्षित व यशस्वी क्लिनिकल निष्पत्ती सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया काळजीपूर्वक नियोजनाने आणि प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पार पाडण्यात आली.
“रुग्ण प्रथम छातीत जडपणाच्या तक्रारी घेऊन आला. स्कॅनमध्ये छातीच्या मध्यभागी, हृदय, श्वासनलिका आणि प्रमुख रक्तवाहिन्या असलेल्या भागात मोठा ट्यूमर दिसून आला. ही केस अपवादात्मक होती, जेथे तिच्या मानेतील थायरॉईड ग्रंथी पूर्णपणे सामान्य होती, तरीही ट्यूमर थायरॉईड टिश्यू असल्याचे दिसून आले. सुरुवातीला तो ट्यूमर थायमोमा असल्यासारखा वाटत होता, पण बायोप्सीत तो दुर्मिळ एक्टॉपिक थायरॉईड गोइटर असल्याचे स्पष्ट झाले.,” असे सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना, पुणे येथील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विनोद गोरे म्हणाले.
हा ट्यूमर हृदय, सुपीरियर व्हेना कावा (मोठी शिरा), एओर्टा आर्क (प्रमुख धमनी), पल्मनरी ट्रंक (फुफ्फुसामधील मुख्य नस) व धमन्या आणि हृदयाचे संरक्षक आवरण असलेले पेरीकार्डियम अशा महत्वाच्या रचनांजवळ धोकादायकपणे स्थित होता. यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक बनली. खरेतर, इतर राज्यांमधील अनेक हॉस्पिटल्सनी यापूर्वी ट्यूमरचे स्थान आणि आकारामुळे त्याच्यावर उपचार करता येणार नाही असे मानले होते.
शस्त्रक्रियेची प्रक्रिया स्पष्ट करताना डॉ. विनोद गोरे म्हणाले, “शस्त्रक्रिया उच्च अचूकतेने आणि कमीत-कमी जोखीमेने करण्यासाठी आम्ही रोबोटिक-सहाय्यित दृष्टिकोन निवडला. यामध्ये बरगड्यांमध्ये, विशेषतः ७व्या आणि ९व्या इंटरकोस्टल स्पेसमध्ये लहान कट करत रोबोटिक उपकरण टाकण्यात आले. रॉबोटिक सिस्टीममुळे छातीच्या भागाचा मोठा आणि स्पष्ट (3D view) दृश्य मिळालं आणि मानवी हातापेक्षा जास्त नियंत्रण आणि लवचिकता मिळाली, जे एवढ्या छोट्या आणि अवघड भागात खूप उपयोगी ठरलं. आम्ही ट्यूमरला छातीच्या अस्तरापासून (प्ल्युरा) हळूवारपणे वेगळे करून सुरुवात केली आणि वर जाणाऱ्या महाधमनी व फुफ्फुसीय धमन्यांमधील अरुंद, खोल भागातून मार्ग काढला. रोबोटिक उपकरणामधून शरीराच्या प्रत्यक्ष स्थितीबाबत अभिप्राय मिळत नसल्यामुळे – ज्याला हॅप्टिक अभिप्राय म्हणतात – कोणत्याही मोठ्या रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ नये म्हणून आम्हाला दृश्य संकेतांवर आणि आमच्या अनुभवावर पूर्णपणे अवलंबून राहावे लागले.”
डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील भूलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास कर्णे म्हणाले, “या केसमध्ये श्वसनमार्ग सांभाळणे हे सगळ्यात मोठं आव्हान ठरलं. ट्यूमरमुळे मुख्य धमनी बाजूला झाली होती आणि श्वासनलिका दाबली गेली होती, त्यामुळे सामान्य पद्धतीने नळी घालणे (इंट्यूबेशन) खूपच धोकादायक होतं. आम्ही फायबर-ऑप्टिक इंट्यूबेशन केले. हे अत्यंत विशेष तंत्र आहे, ज्यामुळे आम्हाला भूल देण्यापूर्वी श्वसनमार्ग पूर्ववत करता आला. संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा दृष्टिकोन आवश्यक होता.”
बहुतेक ट्यूमर रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला असला तरी, मर्यादित जागा आणि जवळच्या रक्तवाहिन्यांमुळे वरच्या बाजूला असलेल्या लहान भागापर्यंत सुरक्षितपणे पोहोचता आले नाही. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टीमने मिनी-स्टर्नोटोमी केली, म्हणजेच छातीच्या हाडाच्या वरच्या भागात एक लहान सर्जिकल कट केले. यामुळे ट्यूमरच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचता आले आणि ट्यूमर सुरक्षितपणे व गुंतागूंतीशिवाय काढण्यात आला.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्क्न जिमखाना, पुणे येथील लॅपरोस्कोपिक व रोबोटिक सर्जन डॉ. संजय कोलते म्हणाले, “या ट्यूमरचा मानेमधील थायरॉईड ग्रंथीशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नसल्याचे आढळून आले, ज्यामुळे तो खरा एक्टोपिक गोइटर असल्याचे सिद्ध झाले. ही अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे. रूग्णामध्ये इनोमिनेट शिरा आणि कॅरोटिड धमन्यांजवळील लहान रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा सुरू झाला, ज्या आम्ही प्रक्रियेदरम्यान काळजीपूर्वक सील केल्या. आवाज नियंत्रित करणाऱ्या नसांपैकी एक असलेल्या डावीकडील रिकरंट लॅरिंजियल नर्व्हवर कदाचित दाब किंवा ताणामुळे परिणाम झाला होता, तर उजवी नस योग्यरित्या कार्य करत होती. अशा गुंतागुंतीच्या केसेसमध्ये, विशेषतः अवघड व खोल भागांपर्यंत पोहोचताना, रोबोटिक शस्त्रक्रिया अधिक अचूकता आणि नियंत्रणामुळे अत्यंत प्रभावी ठरते.”
“शस्त्रक्रिया कमीत-कमी रक्तस्त्रावासह पूर्ण झाली आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला रक्त संक्रमण किंवा व्हेंटिलेटर सपोर्टची गरज भासली नाही. वेदनांवर योग्यरित्या व्यवस्थापन करण्यात आले आणि रिकव्हरी प्रक्रिया सुलभ होती. छातीमध्ये लहान चीर करण्यासह संपूर्ण ट्यूमर काढण्यात आला आणि छातीचा पिंजरा (स्टर्नम) सिंगल वायरसह योग्य स्थितीत आणण्यात आला.” अशी माहिती सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, पुणे येथील लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. फुलचंद पुजारी यांनी दिली.
या केसबाबत मत व्यक्त करत डॉ. गोरे म्हणाले, “या शस्त्रक्रियेमधून अत्यंत गुंतागूंतीच्या ट्यूमरच्या व्यवस्थापनात रोबोटिक तंत्रज्ञानाचे महत्त्व दिसून येते. काळजीपूर्वक नियोजन, अनुभवी डॉक्टर आणि योग्य साधनांसह अशा दुर्मिळ व धोकादायक परिस्थितींवर देखील प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. आमचा ट्यूमर काढून टाकण्यासह शक्य तितक्या सुरक्षित आणि कमीत-कमी इन्वेसिव्ह पद्धतीने उपचार करण्याचा मनसुबा होता.”
ही केस हे एक दुर्मिळ उदाहरण आहे की अत्यंत गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीतसुद्धा प्रगत शस्त्रक्रिया तंत्र, बारकाईने केलेले नियोजन आणि अनेस्थेसिया व कार्डियोव्हॅस्कुलर टीम यांच्यातील समन्वयामुळे अपवादात्मक निष्पत्ती साधता येते. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. स्वप्निल कर्णे यांनी प्रभावी हृदय-संबंधित सपोर्ट प्रदान केला, तसेच रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी हार्ट-लंग मशीन अत्यावश्यक बॅकअप म्हणून सतत स्टँडबायवर ठेवण्यात आले होते.

