देशभरातून ८०० कलावंत, बालकलाकार आणि विविध संस्था शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित करणार
पुणे : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता आणि कँप येथील मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. संस्थापक आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापित केलेली मंदिरे असून दिनांक १५ आणि १६ आॅगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवा अंतर्गत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्ण समर्पण महोत्सवात देशभरातून सुमारे ८०० कलावंत, बालकलाकार आणि संस्था शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित करणार आहेत, अशी माहिती मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, उपाध्यक्ष संजय भोसले, संपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संजय भोसले म्हणाले, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरातील तिन्ही गाभाºयातील श्री श्री राधा-वृंदावन चंद्र, जगन्नाथ-बलदेव-सुभद्रा आणि गौर-निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र-आभूषणांनी सजविण्यात येणार आहे. याच मंदिराच्या आवारात श्री बालाजींचे सुंदर मंदिर आहे. या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण जन्म आणि लीलांवर आधारित कथासुद्धा आजपासून सलग सात दिवस मंदिरात चालू असणार आहे.
दोन्ही मंदिरात सुमारे पाच लाख भाविक दर्शनासाठी येतील. मुख्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव १६ आॅगस्ट रोजी म्हणजेच शनिवारी आहे. पहाटे ४.३० वाजता मंगल आरतीने सुरुवात होईल. हरे-कृष्ण महामंत्राचे २४ तास कीर्तन चालू रहाणार आहे. रात्री ९.३० वाजता भगवंतांना दूध-तूप-मध-फळांचा रस अश्या विविध द्रव्य पदार्थांनी हरे-कृष्ण महामंत्राच्या घोषात अभिषेक करण्यात येईल. रात्री ११ वाजता भगवंतांना अनेक प्रकारचे अन्नपदार्थ-फळे-सुकामेवा-रस इत्यादींचा नैवेद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता भगवंतांची आरती होईल. मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत १५ आणि १६ आॅगस्टला दर्शन चालू राहील. सुमारे पाच लाख भाविकांना प्रसाद वाटपाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
गीता आणि भागवतावर आधारीत माहिती, आध्यात्मिक पुस्तके, पूजा-अर्चेचे साहित्य, भेटवस्तू, अगरबत्त्या, धूप, जपमाळा, गो-उत्पादने, आध्यात्मिक प्रश्न-मंजुषा, आध्यात्मिक शंका-समाधान, असंख्य प्रकारच्या फोटो-फ्रेम, असे भरपूर स्टॉल्स त्याबरोबरच विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्ससुद्धा मांडण्यात येणार आहेत. पुणे आणि परिसरातील नागरिकांनी भगवंतांच्या दर्शन, कथा आणि प्रसाद यांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू आणि विश्वस्तांनी यांनी केले आहे. मंदिराच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भाविकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा,असे आवाहन मंदिराच्या व्यवस्थानाद्वारे करण्यात आले आहे.

