श्रीं साठी कायमस्वरुपी मंदिराचा संकल्प ; मंडळाचे १३४ वे वर्ष
पुणे : सदाशिव पेठेतील श्री गणपती देव ट्रस्ट छत्रपती राजाराम महाराज मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १३४ वर्ष झाली आहेत. गणेशोत्सवात दरवर्षी विविध मंदिरांच्या भव्य प्रतिकृती उभारणारे मंडळ म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेल्या राजाराम मंडळाकडून यंदा देखाव्याऐवजी संत, महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन गणेशभक्तांना होणार आहे. ‘श्रीं’ साठी कायमस्वरूपी मंदिराचा संकल्प असल्याने यंदा देखावा उभारण्यात येणार नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
युवराज निंबाळकर म्हणाले, यंदा देखाव्याऐवजी संत, महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन आणि मंदिर निर्मितीचा संकल्प हे मंडळाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाची पर्वणी भाविकांना मिळणार आहे.तर, तिस-या दिवशी संतांच्या पादुका दर्शनासाठी मंडपामध्ये आणल्या जाणार आहेत. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी, शंकर महाराज, बाळूमामा महाराज, नित्यानंद स्वामी, श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज, नीम करोली बाबा, प.पू.आनंदॠषीजी म.सा. अशा नऊ ते दहा संत महात्म्यांच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. महापुरुष आणि संतांच्या पादुकांचा संगम असलेला हा आगळा धार्मिक कार्यक्रम आहे. सलग ७ दिवस त्या दर्शनासाठी उत्सव मंडपात ठेवण्यात येणार आहेत. वासापूजन कार्यक्रम मंगळवार, दि.१२ आॅगस्ट रोजी होणार आहे.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ल्यांवरची पवित्र माती दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आहे. त्यावरून केलेल्या पादुका संतांच्या पादुकांसह ठेवल्या जातील. संतांच्या आशिवार्दाने पुढच्या वर्षभरामध्ये मंदिर उभारण्याचा संकल्प मंडळाकडून पूर्ण करण्यात येणार आहे. संपूर्ण दगडी घडणीतून ते साकारले जाईल. दरवर्षी भव्य देखावे साकारण्याची आमची परंपरा आहे. परंतु यावर्षी अत्यंत आकर्षक मंदिर उभारण्याची सुरुवात होणार आहे.
उत्सव सुरू झाल्यावर तिस-या दिवशी भजन, कीर्तनाच्या पार्श्वभूमीवर पादुकांची मिरवणूक काढली जाणार आहे. सदाशिव पेठेतील ब्राह्मण मंगल कार्यालय,ज्ञान प्रबोधिनी, कुमठेकर रस्ता, ट्रेनिंग कॉलेज ते छत्रपती राजाराम मंडळापर्यंत मिरवणूक काढली जाणार आहे. यामध्ये शेकडो भाविक सहभागी होतात.
छत्रपती राजाराम महाराज मंडळाची स्थापना १८९२ मध्ये झाली. देशातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करणा-या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी या मंडळाची मूर्ती तयार केली होती. रात्री १० नंतर स्पिकर्स बंदी झाल्यामुळे उत्सवात देशातील विविध मंदिराच्या प्रतिकृती उभारण्याची संकल्पना मंडळाने आणली. यामुळे २४ तास श्रीं चे दर्शन घेत उत्सवाचा आनंद भक्तांना घेता आला. याशिवाय गणेशोत्सवात महिलांसाठी हिरकणी कशी सुरु केला, त्याचे इतर अनेक देवस्थाने व मंडळांनी अनुकरण केले. रुग्णवाहिका सेवा, रुग्णसेवा विभाग उत्सवात मंडळातर्फे सुरु करण्यात आला.
देशातील धार्मिक देवस्थानांचे देखावे उभारण्याची मंडळाची परंपरा आहे. विशेष म्हणजे मंडळ वर्गणी जमा करत नाही. तसेच संपूर्ण देखावा हा फळ्यांवर उभा केला जातो. मध्यभागात गर्दीच्या ठिकाणी हँगिंग मंडप उभारण्याची संकल्पना मंडळाने सर्वप्रथम आणली होती. खड्डे विरहित मंडप, फळ्यांचा मंडप हे मंडळाचे वैशिष्ट्य असून वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा प्रकारे रस्त्याच्या वरच्या बाजूला देखावा साकारला जातो. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील केले जाते. यामुळे शेकडो भाविक या देखाव्याचा आनंद त्यामध्ये फिरून घेऊ शकतात.

