पुणे, दि.११ : “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५” च्या निकालाची कार्यवाही सुरु असून निकालासंदर्भात परीक्षार्थ्यांनी युट्युब चॅनेल्स व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म द्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या, अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता एकाच संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा (बी.एड./ डी.एल.एड.) उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते. व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी” परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे. निकाल लवकरच परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

