पुणे- जिल्ह्यातल्या कुंडेश्वर येथे महादेवाच्या दर्शनाला जाणारी पिकअप व्हॅन उलटून 9 महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातामध्ये जवळपास 35 भाविक जखमी झाल्याचे समजते.पुणे जिल्ह्यातल्या राजगुरूनगर तालुक्यात पाईट येथील कुंडेश्वर येथे महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. श्रावणी सोमवारनिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. या भाविकांच्या व्हॅनचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
पुणे जिल्ह्यात पाईट नावाचे गाव आहे. येथील कुंडेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून साधारणतः दीड तासाच्या अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर असून, येथे भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावणी सोमवारचे निमित्त साधून आज सकाळी अकराच्या सुमारास भाविकांची एक व्हॅन कुंडेश्वर येथे निघाली होती. मात्र, चालकाचे भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटून ते दरीत कोसळले. वाहनाने तब्बल पाच-सहा पलट्या खाल्ल्या. रस्त्यावर रहदारी असल्याने तातडीने स्थानिक लोकांनी खासगी वाहने व 10 हून अधिक ॲब्युलेन्सद्वारे अपघातग्रस्त महिलांना रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच 7 महिलांचा जागीच मृत्यु झाला , तर दोन जणींचा रुग्णालयात नेले असताना वाटेतच मृत्यू झाला. सध्या 35 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.घाट चढताना अचानक व्हॅन मागे आली. त्यामुळे ही घटना घडल्याचे समजते. अपघातामधील मृत आणि जखमी भाविक पापळवाडी येथील असल्याचे समजते. यातील जखमींवर सध्या पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतली. त्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळाले. अपघाताच्या घटनेचा खेड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

