संजय राऊतांसह अनेकांना दिल्लीत अटक
इंडिया आघाडीच्या वतीने मतदान चोरीचा आरोप करत संसद ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये असंख्य खासदार सहभागी झाले असून, महाराष्ट्रातील काही खासदारांचा समावेश आहे. या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांसह अनेकांना अटक करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
आमची ही लढाई शांततेच्या मार्गाने सुरू राहील, असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तर आम्ही मोर्चावर ठाम असून, आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे खासदार नीलेश लंके म्हणाले. दरम्यान, या मोर्चावरून भाजप नेते राम कदम यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूक याद्यांच्या विशेष सघन सुधारणा (SIR) आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत “मतदार फसवणूक” झाल्याच्या आरोपांविरुद्ध निषेध करण्यासाठी संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे 300 खासदार सहभागी झाले आहेत. सध्या मोर्चा पोलिसांनी अडवला असून आंदोलकांना संसद पोलिस ठाण्यात नेले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेते सामील झाले आहेत.
मोर्चात सहभागी झालेल्या सुप्रिया सुळे यांनी वृत्त संस्थेशी बोलताना म्हटले की, आमची लढाई ही शांतीच्या मार्गाने सुरू राहील. तसेच आम्ही महात्मा गांधींना आदर्श मानतो. त्यामुळे त्यांच्या तत्त्वानुसार आम्ही पुढील लढाई लढणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.खासदार नीलेश लंके म्हणाले की, आम्ही मोर्चावर ठाम आहोत. लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे. प्रत्येक खासदार हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेला आहे. त्यामुळे खासदाराला निवडणूक आयोगात नेऊन त्याची भेट घडवून दिली पाहिजे. राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस अटक करणार असले, तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले.
खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “भारतीय निवडणूक आयोग घाबरलेला आहे. ते निवडून आलेल्या प्रतिनिधींना भेटू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. आम्ही मतचोरी प्रकरणी अनेक प्रश्न मुद्देसूद उपस्थित केले आहे. भाजपच्या निर्देशानुसार, मतांची हेराफेरी आणि चोरी होत आहे. त्यावर आम्ही प्रश्न विचारत आहोत. आम्ही चोर आहोत का? आम्ही देशाच्या हिताच्या विरोधात बोलत आहोत का?…”

