पुणे- शहरातील कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चंदर पिराजी मोहिते (वय 56) या कंत्राटदाराने मध्यरात्री कात्रज घाटातील अन्विषा लॉजमागील झाडाला गळफास घेऊन जीव दिला.
मोहिते यांच्या पत्नी शकुंतला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिक संतोष चोरगे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
चंदर मोहिते हे गृहप्रकल्पातील रंगकामाचे कंत्राट घेत असत. चोरगे यांनी त्यांना तीन गृहप्रकल्पात रंगकाम करण्याचे काम दिले होते. या कामाच्या बदल्यात चोरगे यांनी मोहिते यांना एक सदनिका आणि साडेदहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.
मोहिते यांनी परिचितांकडून हातउसने पैसे घेऊन तीनही गृहप्रकल्पांचे रंगकाम पूर्ण केले. मात्र, व्यवहारात ठरल्यानुसार चोरगे यांनी मोहिते यांना पैसे आणि सदनिका दिली नाही. मोहिते यांनी रंगकामाचे पैसे मागितले असता चोरगे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
शिवीगाळ आणि आर्थिक फसवणुकीमुळे मानसिक तणावात असलेल्या मोहिते यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. आवारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

