पुणे : पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘हर घर तिरंगा’या उपक्रमाअंतर्गत तसेच महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा बुधवारी गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रम बुधवार, दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. माजी सैनिकांचा गौरव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात येणार असून अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., एम. जे. प्रदीपचंद्रन, ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या निमित्ताने देशभक्तीपर हिंदी, मराठी गीतांचा ‘माँ तुझे सलाम’हा विशेष कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची असून सूत्रधार निकिता मोघे आहेत तर केतकी महाजन-बोरकर संयोजन करीत आहेत. जितेंद्र भुरुक, गणेश मोरे, अश्विनी खुरपे, आकाश सोळंकी गीते सादर करणार असून रशिद शेख, सुनील जाधव, बाबा खान, रोहित जाधव, सोमनाथ फाटक, सुनील साळवी साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला आहे. पुणेकर रसिकांसाठी कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आला असून रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ आणि प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांनी दिली.
महापालिकेतर्फे बुधवारी माजी सैनिकांचा गौरवदेशभक्तीपर गीतांचा ‘माँ तुझे सलाम’विशेष कार्यक्रम
Date:

