–माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल
पुणे : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस खात्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) पद निर्माण करून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक सरकारने करणे गरजेचे आहे. पण, ती नेमणूक करण्यासाठी मुख्य मंत्री साहेब मुहूर्त कधी लागणार? अशी विचारणा माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (रविवारी) पत्रकाद्वारे केली आहे.
पुण्याच्या वाहतुकी संदर्भात मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे भेटीत बैठक घेऊन घोषणा केल्या. या घोषणांची पूर्तता होण्यासाठी आणखी पंचवीस, तीस वर्षे लागणार आहेत. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
मुंबईच्या धर्तीवर पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) नेमावे, या पदावरील व्यक्तीला प्रशासकीय अधिकारी अधिक असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी करता येते. याकरिता तीन वर्षांपासून काँग्रेस पक्ष मुख्य मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे मागणी करीत आहे. ही मागणी मान्य करून कार्यवाही करावी, असे आवाहन मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी या विषयाला काँग्रेस पक्षाने प्राधान्य दिले आहे. मेट्रो रेल योजना काँग्रेसने आणली, बीआरटी मार्ग चालू केले. बीआरटी मार्गाची गरज मुख्य मंत्र्यांना आता वाटू लागली पण त्यांच्याच भाजपने विरोध करून योजना हाणून पाडायचा प्रयत्न केला. मेट्रो कामाला तीन वर्षांचा विलंब भाजप नेत्यांमधील वादामुळे झाला, असेही मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

