पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (ऑनलाईन) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे ‘नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ’ कार्यक्रम संपन्न झाला. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर सुमारे 12 तासांत पूर्ण होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 5 तासांनी कमी होणार आहे. नागपूर (अजनी) -पुणे वंदे भारत एक्सप्रेस वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड येथून दौंड कॉर्डलाइन मार्गे पुण्याला पोहोचेल. या सेवेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास सुलभ होणार असून व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर ते पुणे मोठ्या प्रमाणावर प्रवास होतो, परंतु सध्या प्रवाशांना खासगी बसेसचे महागडे तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सकारात्मक प्रतिसादातून वंदे भारत सेवा सुरू झाली आहे. नागपूर-पुणे ही देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आहे. तसेच नगर-दौंड मार्गे पुणे येथे जाणाऱ्या विद्यमान मार्गाऐवजी नगर ते पुणे असा थेट रेल्वे मार्ग उभारल्यास अंतर आणि वेळ दोन्ही वाचतील, याबाबतही नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे या औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी रेल्वेचे नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके तसेच रेल्वेचे अधिकारी, विद्यार्थी, प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर ते पुणे… आता फक्त 12 तासांत!
Date:

