पुणे-हडपसर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची राबवलेल्या विशेष मोहिमेत कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार कोयते जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला वाचवू पाहणाऱ्या त्याच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये विश्वजित उर्फ यश रामचंद्र मोरे (वय २०, रा. गोंधळेनगर, हडपसर) याचा समावेश असून त्याच्यासह एका अल्पवयीन आणि त्याच्या आईविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री अकरा ते पहाटे दोन वाजेपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सराईत गुन्हेगारांची अचानक तपासणी करण्यात आली. हडपसर पोलिसांनी मोरे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, अल्पवयीनाने कोयते घरात लपवल्याचे उघड झाले. चौकशीत हे कोयते लपवण्यासाठी त्याच्या आईने परवानगी दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चार कोयते जप्त केले.
ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे, अश्विनी जगताप, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, अमित साखरे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजित राऊत, महेश चव्हाण आणि पथकाने केली.
पोलिसांनी या गुन्ह्यात अल्पवयीनाच्या आईला सहआरोपी करत पालकांकडून गुन्हेगारी कृत्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे. यापूर्वीही अल्पवयीनांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. शहरात कोयते उगारून दहशत माजविणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कृषी अवजारे विक्री करणाऱ्यांनी खातरजमा करूनच कोयत्यांची विक्री करावी आणि ती सराईत वा अल्पवयीनांना करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

