पुणे- कोथरूड येथील रामबाग कॉलनीतील केसरी अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी दोन सदनिका फोडून २२ लाख १७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी शान चिटणीस (५१) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शान चिटणीस यांची केसरी अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर दोन नंबरची सदनिका आहे. त्याचबरोबर पहिल्या नंबरची सदनिकाही याच इमारतीत आहे. ते दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्यांनी सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप व लॅच तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी लाकडी कपाटाचे ड्रॉवर उचकटून त्यामधील हिऱ्यांचे दागिने, सोन्याचे दागिने, चांदीची नाणी आणि रोख रक्कम असा एकूण २२ लाख १७ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सदनिका एक आणि दोन मध्ये चोरी झाल्याची नोंद केली आहे.

