पुणे- अगर मुझसे मोहब्बत है…या उक्तीप्रमाणे जर तुमचे कामावर खरोखर प्रेम असेल तर अशक्य काही नाही अगदी हेच पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर अशक्य ते शक्य कसे होऊ शकते,याचे उदाहरण काल रात्रीतून दाखवून दिले.अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि पथ विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर, साहेबराव दांडगे आणि दिनकर गोजारे यांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या रात्रभरात खडकी औंध असा चारपदरी रस्ता तयार केला आहे.त्यासाठी हे अधिकारी रात्रभर जागेवर तळ ठोकून होते.अतिरिक्त आयुक्तांनी या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.औंध परिसरातील साई चौक,जयकर पथ येथे काल उपायुक्त संतोष वारुळे आणि औंध बाणेर क्षेत्रीय अधिकारी गिरीश दपकेकर यांनी अतिक्रमण कारवाई पूर्ण केली.खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली.यामध्ये जवळपास ४४ अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले. दरम्यान रस्ता मोकळा झाल्याने काल रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून हा रस्ता चौपदरी केला जाणार, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले होते. त्यानुसार हि कार्यवाही करण्यात आली.सध्या जो उपलब्ध होता 12 मी रुंदीचा रस्ता सुमारे 24मी पर्यंत रुंदीचा डांबरीकरणसह झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास निश्चित मदत होणार आहे.
आज पहाटेपर्यंत पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर,अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे आणि दिनकर गोजारे हे अधिकारी खडकी साई चौक ते स्पायसर,औंध रस्ता करायला तळ ठोकून होते.एका रात्रीतून राडारोडा काढणे,फीडर बॅाक्स आणि लाईटपोल काढणे,झाडे ट्रांन्सप्लांट करणे आणि रोड बनवणे ही अशक्य गोष्टी शक्य करून दाखविली.याबद्दल अतिरिक्त आयुक्तांनी पथ विभागाच्या कामाबाबत अभिमान असल्याची भावना व्यक्त करत त्यांचे कौतुक केले.
हा भाग खडकी कॅन्टोन्मेंट व पुणे म.न.पा हद्दीवर येत असून, कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो.खडकी रेल्वे स्टेशन पिछाडीस हा चौक येतो.औंध,बोपोडी हद्दीतील नागरिक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.या चौकामध्ये सुमारे 44 स्टॉल धारकांनी अनेक वर्षापासून अतिक्रमण केले होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.त्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी आल्या होत्या.त्याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणेमहापालिकेला संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. खडकी कॅन्टोन्मेंट मुख्याधिकारी यांनी पुणे महापालिकेकडे अतिक्रमण कारवाई व रस्ता दुरूस्ती साठी मदत मागितली. महापालिका आयुक्त यांनी आवश्यक सहकार्य करणेचे मान्य केले.त्यानुसार काल संयुक्त कारवाई करणेत आली. त्यामध्ये सर्व 44 स्टॉल काढून टाकण्यात आले.त्यामुळे साई चौक मोकळा झाला.रात्री त्याचे डांबरीकरण करून,ज्यादा उपलब्ध रस्त्याचे तातडीने रूंदीकरण करणेत आले.

