रेल्वेने गर्दी कमी करण्यासाठी व प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी ‘राउंड ट्रिप पॅकेज’ अंतर्गत परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यात 20% ची सूट केली जाहीर
प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या जाणाऱ्या उपक्रमात राउंड ट्रिप पॅकेजसाठी 14 ऑगस्टपासून आरक्षण होणार सुरू, 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान जाण्याच्या तर, 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानच्या परतीच्या प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध
सध्या लागू असलेली 60 दिवसांची आगाऊ आरक्षण कालावधी अट, परतीच्या प्रवासासाठी लागू राहणार नाही
नवी दिल्ली-
भारतीय रेल्वे गर्दी टाळण्यासाठी, आरक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सणासुदीच्या काळातील वाढलेली गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या तसेच, विशेष गाड्यांसह दोन्ही बाजूंच्या प्रवासासाठी गाड्यांचा योग्य वापर खात्रीशीर करण्याच्या उद्देशाने, “सणासुदीच्या गर्दीसाठी फेस्टिव्हल रश राउंड ट्रिप पॅकेज” या नावाने एक प्रायोगिक योजना सादर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना सूट दिलेल्या दरात फेरी प्रवासाची संधी मिळणार आहे. ही योजना अशा प्रवाशांसाठी लागू असेल जे खाली नमूद केलेल्या कालावधीत परतीचा प्रवास निवडतील:
- ही सवलत केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा जाण्या येण्याचे (दोन्ही बाजूंचे) तिकीट एकाच प्रवाशाच्या नावाने आरक्षित केले जाईल. परतीच्या प्रवासाचे प्रवाशाचे तपशील जाण्याच्या प्रवासासारखेच असतील.
- 14 ऑगस्ट 2025 पासून आरक्षण सुरू होईल. सर्वप्रथम जाण्याचे तिकीट 13 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत असलेल्या प्रवासासाठी आरक्षित करावे लागेल आणि नंतर कनेक्टिंग जर्नी फीचर वापरून 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत परतीचे तिकीट आरक्षित करता येईल. परतीच्या प्रवासाच्या आरक्षणासाठी आगाऊ आरक्षण कालावधी अट लागू होणार नाही.
- वर निर्देशित आरक्षण केवळ जाण्याच्या आणि येण्याच्या कन्फर्म तिकीटासाठीच दिले जाईल.
- 20 % सवलत केवळ परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावरच मिळेल.
- या योजनेअंतर्गत आरक्षण जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासात एकाच वर्गासाठी आणि समान ओ-डी जोडीसाठी असेल.
- या योजनेअंतर्गत आरक्षित केलेल्या तिकिटांचे भाडे परत केले जाणार नाही.
- वरील योजना फ्लेक्सी भाडे असलेल्या गाड्या वगळता सर्व वर्गांसाठी आणि विशेष गाड्यांसह सर्व गाड्यांसाठी (मागणीनुसार गाड्या) लागू असेल.
- दोन्ही प्रवासांच्या तिकिटावर कोणताही बदल करता येणार नाही.
- परतीच्या प्रवासाच्या तिकिटासाठी इतर कोणत्याही सवलती, रेल्वे प्रवास कूपन, व्हाउचर आधारित बुकिंग, पास किंवा पीटीओ इत्यादी लागू होणार नाहीत.
- जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे एकाच पद्धतीने आरक्षित केले गेले पाहिजे; इंटरनेट (ऑनलाइन) बुकिंग, किंवा आरक्षण केंद्रातून काउंटर बुकिंग.
- या पीएनआरसाठी, चार्टिंग दरम्यान कोणत्याही कारणाने भाड्यात वाढ झाल्यास कोणतेही अतिरिक्त भाडे वसूल केले जाणार नाही.

