पुणे: “कोणताही प्रकल्प उभारताना कंत्राटदार, अभियंता हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र अनेक कंत्राटदार, राजकीय पुढारी भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडलेले दिसतात. अभियंत्यांनी यापासून दूर राहत समाजाचा विचार करून विधायक कार्य करण्याला प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
‘अभियंता मित्र’ या मासिकाच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘शोध अभियांत्रिकी मनाचा’ कार्यक्रमात डॉ. सबनीस बोलत होते. मंगळवार पेठेतील सिंचनभवनच्या डाॅ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, जलसंपदा विभागाचे माजी अधिकारी नंदकुमार वडनेरे, अभियंता मित्र मासिकाचे संपादक डाॅ. कमलकांत वडेलकर, दिनकर गोजारे , सुनिल कदम, अनिरुद्ध पावसकर, युवराज देशमुख, आ रेखा खेडेकर,व्यंकटराव गायकवाड, प्रवीण किडे यांच्यासह पुणे व मुंबई महानगरपालिकेतील अनेक अभियंते उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “सभोवतालचे राजकारण, धर्मकारण, सत्ताकारण अर्थकारण, संस्कृतीकरण भ्रष्टाचाराने बरबटलेले असताना, अभियंत्यांच्या भोवती तयार झालेले आरोपाचे, संशयाचे भूत बाजूला करून विधायक कार्य करणाऱ्या अभियंत्याची सकारात्मक बाजू मांडणे, त्यांचा गौरव करणे हे स्तुत्य काम आहे. वडेलकरांनी या मासिकाच्या माध्यमातून ते अविरतपणे मांडले आहे. अभियंत्याच्या कर्तृत्वाला जात-धर्म नसतो. त्यामुळे समाजहित लक्षात घेऊन विधायक कार्य उभा करण्याची आज गरज आहे. अभियंता तसेच पत्रकार म्हणून वडेलकर शासनाच्या मदतीशिवाय, जाहिरातीशिवाय मासिक चालवण्याचे शिवधनुष्य पेलत आहेत.”
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, “उत्कृष्ट कार्यक्षमता असणारे अनेक अभियंते आजही कार्यरत आहेत. परंतु त्यांची चांगली बाजू समाजासमोर येत नाही. अशावेळी वडेलकर ती आपल्या मासिकातून मांडत आहेत,त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.”
वडेलकर यांनी स्वागत प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. तसेच अभियंता मित्र मासिकाच्या माध्यमातून अभियंता मनाचा शोध कसा घेतला जातो, चांगले काम करणाऱ्या अभियंत्याच्या कार्यावर प्रकाश टाकला जातो, याविषयी सविस्तरपणे विवेचन केले.
सुमारे तीन लक्ष पन्नास हजार रु.स्वर्गीय मोतीलाल धूत व स्वर्गीय प्रभाकर गानू शिष्यवृत्ती सौ अलका धूत श्री. विजय धूत याच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ग्रंथ प्रकाशन, लेखक अभियंत्यांचा, तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार, उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण आणि अभियंता मित्र मासिकाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
मनिष गोखले यांनी सूत्रसंचालन केले. वडेलकर यांनी आभार मानले.

