सुनील माने यांची मागणी
पुणे : वाहतुकीस अडथळा ठरणारी भाकड जनावरे गोरक्षकांना दत्तक द्यावीत व गोरक्षकांसाठी ‘भाकड जनावरे दत्तक योजना’ जाहीर करावी. या जनावरांचा नीट सांभाळ होतो की नाही हे पाहण्यासाठी एक समिती निर्माण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी गोसेवा आयोगाचे महाराष्ट्र अध्यक्ष शेखर मुंदडा यांना दिले. या बाबतचे पत्र त्यांनी ई – मेल वर पाठवले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गायीला महाराष्ट्र शासनाने मातेचा दर्जा दिला आहे हे आपण सर्व जाणतोच. तथापि, अनेक शेतकरी व गोरक्षकांच्या भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या भाकड गायी गुरांचे मालक यांनी या गायी बेवारस म्हणून सोडून दिल्या आहेत. राज्यासाठी ही नामुश्कीची गोष्ट आहे.
अनेक रस्त्यांवर अशा पद्धतीने आढळणाऱ्या भटक्या गायी आणि गुरे यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो, अपघात होतात. वाहनधारकांनी कितीही हॉर्न वाजवला तरी ही जनावरे रस्त्यातून लवकर बाजूला होत नाहीत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. यात लोकांचा वेळ वाया जातो. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या भाकड जनावरांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील गोरक्षकांची यादी करावी व त्यांना ही जनावरे दत्तक म्हणून द्यावीत. गोरक्षकांसाठी ‘भाकड जनावरे दत्तक योजना’ जाहीर करावी. या जनावरांचा नीट सांभाळ होतो की नाही हे पाहण्यासाठी एक समिती निर्माण करावी. या समितीने याबाबतचा प्रतिमहिना आढावा घेऊन लोकांसाठी अहवाल सादर करावा अशी व्यवस्था निर्माण करावी अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
भाकड जनावरे गोरक्षकांना दत्तक द्यावीत
Date:

