बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे वृक्षरक्षाबंधन
पुणे: बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने वृक्षरक्षाबंधन साजरे करण्यात आले. या उपक्रमांतर्गत संगमवाडी पुलाजवळील परिसरात शेकडो देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षारोपणाचा शुभारंभ बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय गुजर व पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक उद्यान अधीक्षक रत्नाकर करडे यांच्या हस्ते झाला. यावेळी बीएआय महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, महापालिकेचे माजी उद्यान अधीक्षक यशवंत खैरे, ‘बीएआय’चे उपाध्यक्ष राजाराम हजारे, माजी अध्यक्ष सुनील मते, पदाधिकारी मनोज देशमुख सी. एच. रतलानी, धैर्यशील खैरे पाटील यांच्यासह असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजय गुजर म्हणाले, “पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असते. कामगारांच्या मुलांचा सन्मान, त्यांना शिष्यवृत्ती, वेलबिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन, संस्थेचे सदस्य व बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी उपक्रम राबविण्यात येतात. शहराच्या मध्यवर्ती भागात केलेल्या वृक्षारोपणामुळे पुणेकरांना ऑक्सिजन मिळेल.”
रत्नाकर करडे यांनी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. बांधकाम क्षेत्रातील लोकांकडून झाडे लावण्यासारखा उपक्रम राबवणे हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. सुनील मते यांनी वृक्षारोपण उपक्रमासाठी पुढाकार व परिश्रम घेतले.

