श्री तुळशीबाग महागणपती भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आणि गणेशोत्सव मंडळांच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान
पुणे : यंदा राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले. त्याकरिता ६०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यंदा गणपतींचे लाईव्ह दर्शन, विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जोरात आणि धूमधडाक्यात साजरा करू, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे करण्यात आले. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार हेमंत रासने, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम आदी उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्याच्या गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सुरेश पवार, श्रीकांत शेटे, रवींद्र माळवदकर, संजय बालगुडे, दत्ता सागरे, बाळासाहेब मारणे, संजीव जावळे, युवराज निंबाळकर, नितीन पाटील, शिरीष मोहिते, राजाभाऊ धावडे यांचा समावेश होता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या संकल्पनेतून ‘मराठी बाणा’ हा ७० एमएम मराठी कार्यक्रम यावेळी सादर झाला.
हेमंत रासने म्हणाले, लोकमान्यांनी संघटीत समाज निर्माण व्हावा, म्हणून गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. आज हा उत्सव जगाचा नकाशावर पोहोचला आहे पुण्याची सांस्कृतिक राजधानी ही ओळख निर्माण करण्यात गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा देखील मोठा वाटा आहे. त्यामुळे हा उत्सव २४ तास निर्बंध मुक्त व भयमुक्त साजरा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नितीन पंडित यांनी प्रास्ताविक केले.

