मुंबई- MMRDA मार्फत बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अखेर वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. आजपासून हा अटल सेतू सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच अटल सेतूवर वाहतूक सुरू झाली आहे. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी अटल सेतूवरून प्रवास करण्यास सुरुवात केली.मात्र वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल सेतूवरुन दुचाकी वाहने, ऑटो रिक्षा, टॅक्टर , मोपेड, तीन चाकी टेम्पो, कमी वेगानं चालणारी वाहनं, बैलगाडी अथवा घोडागाडी, मुंबईकडे जाणारी मल्टी एक्सल जड वाहनं, ट्रक आणि बसला जाण्यास परवानगी नसेल.मात्र हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होताच सर्व प्रथम चर्चा रंगली आहे ती केल्या जाणाऱ्या टोल वसुलीची. वडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. तर या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे.
अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. हा ‘अटल सेतू’ शनिवार 13 जानेवारीच्या सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएच्यावतीने कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे आज सकाळपासूनच अटल सेतूवर वाहने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे.
2 तासांचा प्रवास केवळ 20 मिनिटांत
एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे. यामुळे तब्बल दोन तासांचा वेळ वाचणार आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी हा पूल मैलाचा दगड असेल.
अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये काय आहेत?
- देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
- मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
- 22 किमीच्या सागरी सेतूवरून प्रवासासाठी 250 रुपये टोल
- मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
- अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
- सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
- वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने कॅमे-यात कैद होणार
- समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार
- शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहणार
हा सागरी सेतू उभारण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला हा देशातील पहिला मार्ग ठरणार आहे. या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात. प्रत्येक वाहनाकडून वेगवेगळा टोल आकारला जाणार आहे. त्यानुसार सिंगल, रिटर्न, डेली आणि मासिक पास उपलब्ध करुन दिला जणार आहे. त्यानुसार कार साठी सिंगल टोल हा 250 रुपये आहे. तर, कारसाठी मासिक पास हा 12 हजार रुपयांचा असणार आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल 1580 रुपये तर, मासिक पास काढायला असल्यास तब्बल 79 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

