- प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह विविध विषयातील तज्ञांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन.
मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्या दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे करण्यात आले होते. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिबीराचे उद्घाटन केले तर प्रभारी रमेश चेन्नथला यांनी देखील व्हिडिओ काँफ्रन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
माजी खासदार कुमार केतकर यांनी समकालीन राजकीय परिस्थिती या विषयावर बोलताना देशातील लोकशाही समोर आज हुकूमशाहीचे मोठे आव्हान आहे. काँग्रेस पक्षाने लोकशाहीच्या संवर्धनासाठी बलिदान दिले आहे. याच बलिदानाचा वारसा घेवून काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी आता सक्षमपणे मैदानात उतरावे असे आवाहन केतकर यांनी केले. डॉ. विश्वास उटगी यांनी बँक खासगीकरण हा भांडवलदारांचे खिसे भरण्याचा कार्यक्रम असल्याचे सांगून मोदी सरकारच्या जनविरोधी आर्थिक धोरणांचा समाचार घेतला. ज्येष्ठ नेते आमदार अमित देशमुख यांनी देखील शिबिरार्थ्यांसोबत संवाद साधून पक्ष वाढवण्याचे आवाहन केले.
शाहीर संभाजी भगत यांनी सांस्कृतिक राजकारण या विषयाची मांडणी करताना आजवर पुरोगामी पक्ष, संघटनांनी सांस्कृतिक राजकारणाकडे दुर्लक्ष केले त्याचा गैरफायदा प्रतिगामी शक्तींनी घेतला त्यामुळे आगामी काळात सांस्कृतिक राजकारण हे जोरकसपणे करण्याविषयी मार्गदर्शन केले.
आशुतोष शिर्के यांनी नव्या मानसिकतेची सुरुवात ही विजय साकार करण्याची पूर्व अट असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपयशाची आणि टिकेची भीती न बाळगता वास्तवाचा स्वीकार करून पुढील वाटचाल केली पाहिजे हे सांगितले. तसेच निमिष साने आणि संदीप ढवळे पाटील यांनी काँग्रेस पक्षांर्गत नेतृत्व विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या नेतृत्व संगम, शक्ती अभियान, जय जवान जय किसान अशा विविध उपक्रमांची माहिती दिली.
संवाद स्वरुपात हे सत्र पार पडले. सायंकाळी सर्वधर्मीय सामूहिक प्रार्थना झाली. शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात श्रमदानाने झाली. शिबिरार्थींनी टिळक भवन परिसराची स्वच्छता करून कचरा गोळा केला. त्यानंतर राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी भाषा आणि राजकारण या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. मराठी भाषा संवर्धन आणि राजकारण हे हातात हात घालूनच होवू शकते. या दिशेनेच महाराष्ट्र धर्म आपण जागवू शकतो आणि तसे झाले तरच महाराष्ट्राचा गायपट्टा होण्यापासून वाचवू शकतो यावर पवार यांनी जोर दिला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा त्यासाठी प्रेरणादायी आहे तो आपण वाचला पाहिजे असे प्रा. पवार म्हणाले.
श्यामसुंदर सोन्नर यांनी संतसाहित्य आणि संविधान या विषयाची मांडणी करताना संपूर्ण संत साहित्याचा आशय हाच भारतीय संविधानाचा गाभा आहे. समता, लोकशाही आणि सामाजिक न्याय हीच संताची भूमिका राज्य घटनेच्या अंमलबजावणीतून अपेक्षित आहे याविषयी विस्ताराने मांडणी केली.
प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकारणाचे विकेंद्रीकरण हा काँग्रेस पक्षाचा धोरणात्मक कार्यक्रम आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामसभांच्या बळकटीकरणातून सर्व समाजघटकांच्या विकासाची दिशा निश्चित होवू शकेल त्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच परिकल्पनेतील भारत या विषयी देखील सपकाळ यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस गुरबचनसिंग बच्चर, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी उपस्थित होते. तर सांगली जिल्यातील राष्ट्र सेवा दलाच्या पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.

