- दत्तात्रय कावरे यांना लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार प्रदानपुणे परिवार तर्फे गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार सोहळा.
पुणे : गणपती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते वर्दीत नसतात पण वर्दी नसलेले पोलिसच आहेत. त्यांनी गणेशोत्सवात पोलिसांसोबत काम करून, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. मंडळांनी पोलिसांच्या कोणत्याची कृतीचा आणि सूचनेचा राग मानून घेऊ नका. तुमच्या सुरक्षेसाठी पोलिस असतात. पोलिस सदैव गणपती मंडळाच्या सोबत आहेत. चांगल्या आणि सुरक्षित पद्धतीने गणेशोत्सव पार पाडू, अशी भावना सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केली.
पुणे परिवारच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे माजी अध्यक्ष दत्तात्रय कावरे यांना तर दिपक दाते, हेमचंद्र दाते यांना लोकमान्य गणेश सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. माजी आमदार उल्हास पवार, आमदार हेमंत रासने, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, महेश सूर्यवंशी, आयोजक विनायक घाटे, ॲड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, प्रकाश ढमढेरे यावेळी उपस्थित होते.
रंजनकुमार शर्मा म्हणाले, गणेशोत्सवाच्या संदर्भात बैठका सुरू आहेत त्यामध्ये सगळ्यांचे समाधान होईल असा सर्व मंडळाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला जाईल. एक गणपती एक पथक, इतर गणपती मंडळांना चांगला वेळ असे अनेक मुद्यांसदर्भात विचार सुरू आहेत. गणेश मंडळाच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्याचा सन्मान केला जातो हे स्तुत्य आहे. मागील वर्षापेक्षा चांगले काम यापुढेही कार्यकर्त्यांनी करावे. ढोल ताशा पथक विदेशात जाऊन वादन करतात या पथकांचा अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले.
उल्हास पवार म्हणाले, जो पर्यंत चंद्र सूर्य असेल तो पर्यंत हा गणेशोत्सव चालू राहील. अनेक देशांमध्ये गणपती ही आद्य देवता आहे. या गणपतीचा उत्सव कसा असला पाहिजे, याचे आत्मचिंतन करायला पाहिजे. लोकांचे प्रबोधन व्हावे ही भूमिका गणेशोत्सवामागे होती तो विचार कार्यकर्त्यांनी आणि गणेश मंडळांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेमंत रासने म्हणाले, गणेशोत्सवाला राज्यउत्सव म्हणून दर्जा मिळाला आहे. राज्यउत्सवाच्या माध्यमातून पुण्याचा उत्सव निर्बंध आणि भयमुक्त करायचा आहे, ही सगळ्यात पहिली मागणी आहे. उत्सवातील त्रुटी सगळ्यांनी मिळून दूर केल्या पाहिजेत. उत्सवात येऊन कोणाला अडचण वाटता कामा नये. महिला सुरक्षा, आरोग्य या सुविधा चांगल्या पद्धतीने आपण देऊ. खाकी वर्दीतले पोलिस ही गणेशोत्सवाचे कार्यकर्तेच आहेत. उत्सवात मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करत असेल तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
पराग ठाकूर म्हणाले, संकटसमयी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याची आठवण आधी येते. परंतु मंगल समयी तो सगळ्यात शेवटी असतो. ॲड. प्रताप परदेशी म्हणाले, गणेशोत्सव मंडळातील खरा कार्यकर्ता पुणेकरांसमोर आणण्याचे काम या पुरस्काराच्या माध्यमातून होते.
होनाजी तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राहुल आलमखाने, तरुण शिव गणेश मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळाचे कार्यकर्ते ओंकार कलढोणकर, विधायक मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिषेक मारणे, सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समर्थ प्रतिष्ठान वाद्य पथकाचे संजय सातपुते यांना गणराया गुणगौरव पुरस्कार तर सामाजिक कार्यकर्ता सिराज पूनावाला यांना सद्भावना सलोखा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महेश सूर्यवंशी, पुनीत बालन यांनी मनोगत व्यक्त केले. विनायक घाटे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. प्रताप परदेशी यांनी पुरस्काराची माहिती दिली. प्रकाश ढमढेरे यांनी आभार मानले.

