ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रभा अत्रे यांचे गायकीसोबतच ठुमरी, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील एक अनुभवी सूर हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
प्रभा अत्रे यांना शनिवारी पहाटे झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. प्रभा अत्रे यांचे नातलग अमेरिकेत आहेत. त्यामुळे ते मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नुकताच मिळाला होता अटल संस्कृती पुरस्कार
डॉ. प्रभा अत्रे यांना नुकताच संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा अटल संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बहुधा ही त्यांची सार्वजनिक कर्यक्रमातील शेवटची उपस्थिती ठरली. त्यांचा एक हात मोडला होता. पण त्यानंतरही केवळ अटलजींच्या नावाचा पुरस्कार असल्यामुळे त्या या पुरस्कार सोहळ्याला आल्या होत्या. त्यांनी स्वतःच आपल्या छोटेखानी मनोगतात हे सांगितले होते.
प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला. वयाच्या 8 व्या वर्षी त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असताना त्यांनी विज्ञान व कायदा विषयाची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. एक प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका म्हणून त्यांचा नावलौकिक होता. प्रभा अत्रे यांची संगीत क्षेत्राशी संबंधित तब्बल 11 पुस्तके प्रकाशित आहेत. या पुस्तकांमुळे संगीत रसिकांना संगीतकला समजून घेण्यास मदत झाली. त्यांच्या संगीत क्षेत्रातील या भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण आदी नागरी पुरस्कारांनी सन्मान केला होता.
किराणा घराण्याच्या गायनकलेला नवीन दिशा
प्रभा अत्रे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला विशेषतः किराणा घराण्याच्या गायनकलेला नवीन दिशा दिली. भारतीय संगीत कलेला पाश्चिमात्य देशात लोकप्रियता मिळवून देणाऱ्या त्या पहिल्या गायिका होत्या. 1969 पासून त्या पूर्णवेळ संगीत मैफिली करू लागल्या. आवाज लावण्याची पद्धत, सुस्पष्ट शब्दोच्चारण व परिणामकारक भावना अविष्कार यांच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीतात नवीन जाणीव आणली.
प्रभा अत्रे यांनी ‘डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन’ची स्थापना करून आपले सामाजिक व सांस्कृतिक भान जपले. प्रतिभावान विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलाकार म्हणून आकार देण्यासाठी तसेच संगीत रसिकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘स्वरमयी गुरुकुल’ची स्थापना केली. डॉ. प्रभा अत्रे यांना 1990 मध्ये पद्मश्री, 1991 मध्ये संगीत नाटक अकादमी, 2002 मध्ये पद्मभूषण आदी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

