मुंबई, ७ ऑगस्ट २०२५ : हिंदुजा ग्रुपने आनंद आगरवाल यांची ग्रुप प्रेसिडेंट – फायनान्स या पदावर नियुक्ती केली आहे. जवळपास तीन दशकांचा व्यावसायिक अनुभव असलेल्या आगरवाल यांनी कृषीविषयक उत्पादने, पायाभूत सुविधा (ऊर्जा), एफएमसीजी, वित्तीय सेवा, सिमेंट, धातू आणि बँकिंग पेमेंट सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. कॉर्पोरेट फायनान्स, ट्रेझरी, विलीनीकरण व अधिग्रहण (एम अॅंड ए), भांडवली रणनीती आणि गुंतवणूकदार संबंध या बाबतीत त्यांच्याकडे व्यापक कौशल्य आहे.
या नियुक्तीबाबत माहिती देताना हिंदुजा समूहातील मनुष्यबळ विकास विभागाचे ग्रुप प्रेसिडेंट अमित चिंचोलकर म्हणाले, “आमच्या समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये आता धोरणात्मक विस्ताराचा नवा टप्पा सुरू होत असून, त्यासाठी सक्षम आर्थिक नेतृत्व अत्यावश्यक आहे. कॉर्पोरेट फायनान्स आणि विलीनीकरण-अधिग्रहण या क्षेत्रातील आनंद यांचा सखोल अनुभव, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक धोरणे राबविण्याची सिद्ध क्षमता या आमच्या समूहाच्या वाढीला गती देतील. आमच्या पुढील विकासाच्या टप्प्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
हिंदुजा समूहाचे फायनान्स विभागाचे नववियुक्त ग्रुप प्रेसिडेंट आनंद आगरवाल म्हणाले, “हिंदुजा समूहाच्या सातत्याने होत असलेल्या प्रगतीमध्ये आपण योगदान देण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. आर्थिक बांधणी अधिक बळकट करणे आणि समूहातील विविध धोरणात्मक उपक्रमांना पाठबळ देणे, यावर माझा भर राहील. आर्थिक कार्यक्षमता वाढवणे, भांडवली वापर अधिक प्रभावी बनवणे आणि समूहाच्या विस्तार योजनांना गती देणे या प्रमुख गोष्टी माझ्या कामकाजाच्या केंद्रस्थानी असतील.”
आगरवाल यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रायव्हेट इक्विटी फंड्स, निवृत्तीवेतन निधी संस्था (पेंशन फंड्स) आणि सार्वभौम संपत्ती निधी (सॉव्हरिन वेल्थ फंड्स) यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर इक्विटी निधी उभारण्यात यश मिळवले आहे. तसेच त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये अनेक उच्च मूल्य असलेल्या विलीनीकरण व अधिग्रहण (एम अॅंड ए) व्यवहारांचे नेतृत्व केले आहे. हिंदुजा समूहामध्ये रुजू होण्यापूर्वी आगरवाल हे चंबळ फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी टाटा पॉवर, पीपल कॅपिटल पीई, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज, आदित्य बिर्ला ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी लिमिटेड या नामांकित संस्थांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.
आगरवाल चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, आयसीडब्ल्यूए आणि सीएफए ही सर्व व्यावसायिक अर्हता धारण करतात. तसेच त्यांनी आयआयएम, अहमदाबाद येथून एक्झिक्युटिव्ह एमबीए हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

