मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५:
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात ५ ऑगस्ट रोजी आलेल्या ढगफुटीजन्य पुरामुळे गंगोत्री यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांपैकी महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते. यामध्ये महाराष्ट्रातील ५१ यात्रेकरू यांचेशी संपर्क होऊन ते सुखरुप असल्याची खात्री झाली आहे.विशेषतः संभाजीनगरमधील १८ जणांच्या यात्रेकरूंचा एका ग्रुपशी संपर्क पूर्णतः तुटला होता. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने लक्ष घालून प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या सर्व यात्रेकरूंशी संपर्क प्रस्थापित होऊन ते सुरक्षित असल्याची माहिती श्रीमती रंजना कुलकर्णी संपर्कप्रमुख लातूर जिल्हा तसेच श्री भालचंद्र चव्हाण संचालक आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून खात्री करून मिळाली. ही माहिती त्यांनी संबंधित नातेवाईकांना देऊन त्यांना दिलासा दिला.
यात्रेकरूंमध्ये प्रमिला शिवाजी दहिवाळ, शिवाजी रावसाहेब दहिवाळ, कल्पना अनिल बनसोड, उषा अजय नागरे, किरण भीमराव शहाणे, ज्योती रमेश बोरडे, नूतन, संतोष कुमार कुपटकर, उज्वला अरुण बोर्डे, मंजुषा नागरे, शुभांगी किरण शहाणे, शिवदत्त शहाणे, अरुणकुमार वामनराव बोर्डे, भारती लक्ष्मणराव कुपटकर, श्रीकृष्णा थोरहत्ते, शीतल थोरहत्ते, वेदांत थोरहत्ते आणि नवज्योत थोरहत्ते यांचा समावेश होता. पुरामुळे त्या भागातील रस्ते, घरे, हॉटेल्स आणि लष्करी तळांचेही मोठे नुकसान झाले होते. परिणामी संपर्क आणि वाहतूक पूर्णतः खंडित झाली होती. मोबाइल नेटवर्क बंद असल्यामुळे नातेवाईक अत्यंत चिंतेत होते.
डॉ. गोऱ्हे यांनी उत्तराखंड व महाराष्ट्र शासनाच्या तत्पर कार्यवाहीसाठी आभार व्यक्त केले आहेत.तसेच उर्वरीत पर्यटकांना सुखरुप परत आणण्याकरिता तातडीने कारवाईसाठी मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य,मा.अध्यक्ष उत्तराखंड विधानसभा,मा.मुख्यमंत्री उत्तराखंड राज्य निवेदनपाठवून विनंती केली असून, उत्तराखंड सरकारशी समन्वय साधून अडकलेल्या नागरिकांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला. महाराष्ट्र शासनाने देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विशेष दक्षता घेतली व ५१ पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आपत्तीमधील महाराष्ट्रातील नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि अशा वेळी शासन आपल्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यात अडकलेल्या यात्रेकरूंना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये.”
राज्य सरकारकडून अडकलेल्या नागरिकांसाठी वैद्यकीय, अन्न, निवास व प्रवास सुविधांची मदत करण्यात येणार आहे. बेपत्ता किंवा रुग्णालयात दाखल असलेल्या पर्यटकांची माहिती मिळवण्यासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून या बाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
महाराष्ट्र राज्य शासन हेल्पलाईन नंबर 9321587143/ 022-22027990/022-22794229
उत्तराखंड राज्य शासन हेल्पलाईन नंबर
0135-2710334/8218867005
शासनाच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे या ५१ यात्रेकरूंना दिलासा मिळाला असून, त्यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सरकार आपल्या पाठीशी असल्याने आणि मा उपसभापतींच्या पाठपुराव्यामुळे भीतीच्या क्षणातही आश्वस्त वाटत असल्याचे मत यात्रेकरू व नातेवाईकांनी व्यक्त केले.

