पुणे – मनसे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यात झालेल्या वादंगात आता महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्त राम यांच्या पाठीशी उभे राहत मराठी माणूस,अधिकारी आयुक्त राम यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे. काल महापालिकेत झालेल्या मनसे आणि आयुक्त राम यांच्या वादंगामुळे महापालिकेने मनसे च्या कार्यकर्ते आणि नेत्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार तर दिली आहेच पण त्यानंतर आता लगेचच हिरवळीवर येत जोरदार निषेधही नोंदविला आहे.
प्रकरणाची सुरुवात आयुक्तांच्या घरातून 20 लाख रुपयांच्या वस्तूंच्या चोरीने झाली. या प्रकरणात थेट निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत घुसून जाब विचारला. मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांनी त्यांना गुंड म्हटल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलनही केले.
मनपाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. परंतु आयुक्त 30 ते 35 अधिकाऱ्यांसोबत बैठकीत असताना थेट घुसून धिंगाणा घालणे चुकीचे आहे. कर्मचाऱ्यांच्या मनात याबद्दल तीव्र संताप आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की त्यांचा जनतेला वेठीस धरण्याचा हेतू नाही. कामबंद आंदोलन सुरू असले तरी नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्षांनीही आयुक्तांच्या भूमिकेविरोधात गुरुवारी दुपारी निषेध आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. पोलिसांनी या प्रकरणी मनसेचे किशोर शिंदे,प्रशांत मते,नरेंद्र तांबोळी,अविनाश जाधव,महेश लाड आणि इतरांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर गैर कायदेशीर मंडळी जमवणे,सभागृहात बेकायदेशीर प्रवेश करणे, सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे आरोप आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी सांगितले की आरोपींविरुद्ध कलम १३२, १८९(२), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

