पुणे- अगोदर पुण्याचे जिल्हाधिकारी आणि नंतर थेट दिल्ली दरबारी रुजू झालेले आय ए एस अधिकारी नवल किशोर राम यांनी काही माहिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांना थेट महापालिकेच्या आवारात देखील प्रवेश बंदी घालण्याचा (बेकायदेशीर ?)हुकुम सोडल्यावर आज महापालिकेत आंदोलक बनून आलेल्या राज ठाकरे यांच्या जवळच्या मनसैनिकांना अर्थात किशोर शिंदे,साईनाथ बाबर आणि अन्य मंडळींना थेट धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात..आयुक्त रुबाबदार पद्धतीने नव्हे तर आक्रमक पद्धतीने उभे राहून बसलेल्या मनसैनिकांना तुम्ही गुंड आहात असे म्हणताना दिसत आहेत.त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून आणि काही कृतींवरून आता आयुक्त हे मराठी विरोधी किंवा भाजपच्या दिल्लीश्वरांनी पुण्यात विरोधकांना चेपवायला पाठविलेले अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
नेमके हे मनसे चे शिष्ट मंडळ आयुक्त कार्यालयात गेले कशाला होते ?
आता प्रश्न हा उभा राहतो कि हे मनसे चे शिष्ट मंडळ नेमके महापालिका आयुक्त कार्यालयात गेले कशाला होते तर त्याचे उत्तर आजच्या सर्व वृत्तपत्रात दडले आहे. आजच्या वृत्तपत्रांमध्ये महापालिका आयुक्त बंगल्यात चोरी झाली पण FIR झालेला नाही अशा बातम्या आल्या आहेत आणि हि चोरी लपविली जाते कि काय अशी शंका निर्माण होत होती. सुमारे २० लाखाचे साहित्य आयुक्त बंगल्यासाठी मागविले जाणार असे या बातमीत म्हटले होते .महापौर बंगल्यातून झालेल्या चोरीचा यात संदर्भ देण्यात आला होता.नेमके यात काय आहे ? तुम्ही येताच हे काय सुरु झाले आहे अशी विचारणा करायला हे शिष्टमंडळाने आयुक्त कार्यालय गाठले होते मात्र येथे यावेळी आयुक्त यांची कसली तरी गोपनीय मिटिंग सुरु होती अन त्यात हे धडकले.यामुळे वादंग झाल्याचे समजते.
नवल किशोर राम यांच्या वादग्रस्त कृती – दरम्यान या प्रकारामुळे दिल्लीहून आलेले हे आयुक्त आता भाजपचे एजंट म्हणविले जाऊ लागले आहेत.त्यांनी जनतेची आणि आयुक्तांची होणारी भेट जवळ जवळ बंद केल्याचा त्यांच्यावर आरोप होतो आहे. एवढेच नव्हे तर काही भाजपचे कार्यकर्ते जे माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून महापालिकेत जात होते त्यांच्यावर जरी काही आरोप होत असले तरीही महापालिका आयुक्त यांना अशा कार्यकर्त्यांना नागरिकांना महापालिकेच्या आवारात येण्यास बंदी घालण्याचा कायद्याने कोणताही अधिकार नाही असे सांगितले जाते.तरीही त्यांनी बंदी घालून हुकूमशाहीची चाहूल करवून दिली. आणि जर माहिती अधिकार नावाने किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणून कोणी प्रशासनाला त्रास देत असले गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करत असेल तर त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार नोंदवून रीतसर कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी हि बंदीची कारवाई केली आणि नंतर ओरडा झाल्यावर संबधितांविरोधात पोलिसात तक्रार केली.स्थायी समिती,सर्वसाधारण सभा जनतेला दडवून चालविणे ठराविक लॉबीलाच जवळ करून त्यांनाच सहकार्य करणे असे आरोप या आयुक्तांवर होत आहेत. वास्तविक पाहता ज्यांचे काम पुण्यात जिल्हाधिकारी असताना अत्यंत चांगले होते त्यांनी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर असे काय झाले म्हणून चर्चा होऊ लागली आहे.
आयुक्तांच्या बंगल्यात खरेच चोरी झाली काय ?
दुसरा मुद्दा असाही मांडला जातो कि महापालिका आयुक्त यांच्या बंगल्यात खरेच चोरी झाली काय ? कि या बातम्या पसरवल्या गेल्या ? या पूर्वी भोसले नामक जे आयुक्त होते त्या मराठी आयुक्तांना बदनाम करण्याचा डाव तर नव्हता ना ? एक ना अनेक प्रश्न आयुक्तांच्या बंगल्यात चोरी या शीर्षकाने निर्माण केले आहेत. जर चोरी झाली तर पोलिसात तक्रार का नाही केली ? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. महापौर बंगल्याच्या बाबतीतही हा प्रश्न आहेच. एवढे सुरक्षा रक्षक, C C TV कॅमेरे असताना हि चोरी खरेच झाली काय ? कि स्वताहून कोणी येथील साहित्य सहमतीने नेले ? एक ना अनेक मुद्दे चर्चिले जात आहेत.पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्याचे नाव तपस्या आहे.या बंगल्यात आता विद्यमान आयुक्त नवल किशोर राम राहायला आले आहेत . यापूर्वी इथे आधीचे आयुक्त राजेंद्र भोसले रहात होते. राजेंद्र भोसले यांनी बंगला सोडल्यावर तो नवल किशोर राम यांच्या ताब्यात आल्यावर या बंगल्यात असलेल्या ॲंटिक वस्तू, महागडे झुंबर, फ्रीज , किचनची चिमणी , एलईडी टीव्ही , महागड्या लाईट फिटींग , स्वीच , मोठ्या कुंड्या , बंगल्यात असलेली माती असा सुमारे पंचवीस लाख रूपयांचा ऐवज गायब असल्याच लक्षात आलं आहे. आता या वस्तू कुठे गेल्या यावर महापालिकेत कुणी एक चकार शब्द काढायला तयार नाही. उलट नवे आयुक्त रहायला गेल्यावर लगेच सगळं पुन्हा आहे तसं करण्यासाठी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून वीस लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र जे चोरीला गेलं आहे त्याची कुठेही फिर्याद करण्यात आलेली नाही.
एकंदरीत प्रशासकीय काळात आता प्रशासक म्हणून आयक्त या एकमेव अधिकाऱ्याच्या हाती सर्वाधिकार असल्याने मोठी समस्या निर्माण होते असताना दिसत आहे. आणि ते एकटेच प्रत्येक बाबीवर टार्गेट देखील होऊ शकतील असेही चित्र नाकारता येणारे नाही.

