पुणे : दृष्टी नसली तरी दृष्टिकोन असतो, ध्येय असते आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हवी असते योग्य दिशा. ही दिशा आता पुण्यातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना मिळाली आहे ‘ऐकाकी ऑडिओ लर्निंग लॅब’च्या रूपाने. शिक्षणाच्या प्रकाशाकडे नेणारा हा आवाज दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नवी आशा आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, कोथरूडमधील पुणे ब्लाइंड स्कूलमध्ये ‘ऐकाकी ऑडिओ लर्निंग लॅब’ची स्थापना करण्यात आली आहे.
लर्नकीज एज्युटेन्मेंट प्रा. लि. आणि विकसित भारत इनोव्हेट प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या लॅबची निर्मिती करण्यात आली असून, शैक्षणिक दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे, असे ऐकाकी ऍपचे निर्माते सचिन पंडित यांनी सांगितले. विकसित भारत इनोव्हेट प्रा.लि. या संस्थेने लॅबचे संपूर्ण नियोजन, तांत्रिक रचना व कार्यान्वयन प्रभावीपणे पार पाडले आहे.
विकसित भारत इनोव्हेट प्रा. ली. च्या मंजुषा वैद्य म्हणाल्या की, या लॅबच्या माध्यमातून इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारित ऑडिओ कंटेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याचे ऑडिओ रूपांतर केले गेले असून, विद्यार्थ्यांना हेडफोन व ऑडिओ प्लेयरद्वारे सहजतेने अभ्यास करता येतो. प्रत्येक धडा आवाजाच्या चढ-उतारासह शास्त्रीय दृष्टीकोनातून वाचिक अभिनयातून रेकाॅर्ड केल्यामुळे विद्यार्थ्यांना विशेष रस निर्माण झाला आहे. त्यांना न समजलेल्या गोष्टी देखील पुन्हा ऐकता येतात. विद्यार्थ्यांना हेडफोन व आॅडिओ प्लेअरच्या माध्यमातून वैयक्तिक पातळीवर ऐकण्याची सुविधा ‘ऐकाकी ऑडिओ लर्निंग लॅब’ च्या माध्यमातून करण्यात आली आहे. स्व-अध्ययनासोबतच स्वतःच्या गतीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या प्रकल्पाला प्रतिष्ठित कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गत विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला नवी दिशा देणाऱ्या या प्रकल्पामुळे, दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्रात एक आशादायक आणि परिणामकारक पाऊल उचलले गेले आहे, असे अंध शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा रांका यांनी सांगितले. या संपूर्ण उपक्रमात अश्विनी भालेकर, समीर साळुंके व नेहा तातुसकर यांनी मोलाचा सहभाग घेतला.

