पुणे : सिद्धहस्त लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याच कथांवर आधारित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून अनिता पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच’ ही कथा सादर केली. पल्लवी भालेकर (पुरुष) यांना द्वितीय तर धनंजय जोशी (जीवा शिंगी) यांना तृतीय क्रमांक मिळाला.
एकपात्री कलाकार परिषद, रसिक कलारंजन आणि निळू फुले कला अकादमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष असून 40 स्पर्धकांनी कथांचे सादरीकरण केले. दि. 1 ते दि. 5 ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 5) आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ पत्रकार सु. ल. खुटवड यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे परीक्षक ज्येष्ठ कलाकार रवींद्र देशपांडे, कल्पना देशपांडे तसेच एकपात्री कलाकार परिषदेचे पपिचंद श्रीश्रीमाळ, रसिक कलारंजनचे प्रमुख बिपिन दफ्तरदार मंचावर होते. शास्त्री रोडवरील निळू फुले कला अकादमी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्योती ब्रह्मे (रावसाहेब सदावर्ते), ज्योती कानेटकर (प्रभूची कृपा), प्रिया उंडे (भंडाऱ्याचे हॉटेल) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे आणि जयवंत दळवी यांच्या साहित्यातून आपल्यावर संस्कार झाल्याचे सांगून सु. ल. खुटवड म्हणाले, दळवी यांच्या साहित्याची समीक्षकांनी दखल घेतली नाही त्याचप्रमाणे दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असूनही सरकारनेही काही कार्यक्रम घेतले नाहीत याची खंत आहे.
रवींद्र देशपांडे म्हणाले, केवळ हौस म्हणून स्पर्धेत सहभागी होऊ नये. चांगल्यात चांगले काय देता येईल याचा कायम विचार आणि क्षमतांचा वापर करायला हवा. कल्पना देशपांडे यांनी तांत्रिक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा कुलकर्णी, भाग्यश्री देशपांडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिलीप धायगुडे, अंजली दफ्तरदार, अनुराधा कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

