पुणे, दि. ५: महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, मुंबई व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लघु, मध्यम उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे, गतीने बदल स्वीकारणे आणि सतत सुधारणा करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा पुण्यात नुकतीच संपन्न झाली.
कार्यशाळेला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे कंपनी सचिव अक्षय पाठक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या उपसंचालक श्रीमती मंजुषा चव्हाण, छत्रपती संभाजीनगरचे समन्वय विभाग प्रमुख प्रदीप इंगळे, नागपूर विभागाचे रितेश रंगारी, एच. आर. वाघमारे, बार्टीचे राज्य समन्वयक डी. यू. थावरे तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत ३३५ उद्यमींनी सहभाग नोंदवला. तसेच १७८ उद्योग करु इच्छिणाऱ्या नवउद्योजकांनी विविध स्टॉलला भेटी दिल्या. कार्यशाळेत जेम पोर्टल, डिजिटल लोन, आर्थिक साक्षरता, महिला आणि अनुसूचित जाती-जमाती मधील उद्योजकांमध्ये जागृती निर्माण करुन क्षमतेत वाढ करणे, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाजारपेठ ब्रँडिंग व मार्केटिंग, नवीन बाजारपेठ शोधणे, वित्तपुरवठ्याच्या योजनेचा लाभ घेणे आदी विषयांवर विषय तज्ञांनी मार्गदर्शन केले, असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी डॉ. ए. एस. डबीर यांनी कळविले आहे.
0000

