पुणे- ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, करिअर मार्गदर्शन शिबिर आणि शिष्यवृत्ती प्रदान सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि एअरमार्शल भूषण गोखले यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव त्यांचे आगमन रद्द झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंडळाचे संचालक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. केशव देशमुख सर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उपस्थिती दर्शवली तर सुप्रसिद्ध साहित्यिक वि. दा. पिंगळे सर, क्रिकेट खेळाचे प्रशिक्षक श्याम ओक, माजी नगरसेविका सौ लक्ष्मी दुधाने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने इयत्ता बारावीच्या ओजस देशपांडे, तेजल गव्हाणे, सार्थक भास्कर, हर्षदा शेलार आणि ऋतुजा भांडवलकर या पाच विद्यार्थ्यांना तर इयत्ता दहावीच्या गुरुराज धोंगडे, सई धडपळे, मिहीर आपटे, आदर्श सातपुते आणि भार्गव मराठे या पाच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि आर्थिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याप्रसंगी तब्बल पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह उपस्थिती दर्शवली असून आपल्या प्रभागातील पलक निलेश वरपे या महाराष्ट्र राज्याकडून क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८३% गुण प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. अभ्यासासह आपला छंद जोपासत खेळाला प्राधान्य दिले आणि पलकने उत्तम गुण प्राप्त केले असून तिच्या या मेहनतीत तिच्या पालकांनीही साथ दिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करत सत्कार केला.
यावेळी मार्गदर्शन करताना पुस्तकांचे महत्व, अभ्यासाबद्दल दृष्टिकोन आणि गेल्या १४ वर्षांत ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले कार्य आदी गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. समाजात वावरत असताना आपण समाजासाठी काही देणे लागतो, असे प्रतिपादन करताना सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी माझे सहकारी श्री. प्रमोदजी शिंदे, दीपकजी चांदकुडे, श्री. किशोरजी शेडगे, श्री. विष्णूजी सरगर, श्री. विनायकजी देशमुख तर सूत्रसंचालक रत्नाताई दहीवळकर तसेच ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला ॲडव्हान्स डॉक्युमेंट फोल्डर प्रदान करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.
आपल्या समाजातील विद्यार्थी वर्गाला यथायोग्य मार्गदर्शन लाभणे आवश्यक असून याबाबत शिबिराचे आयोजन केल्याने पालक आणि विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांचे हे शब्द हीच आमच्या परिश्रमांची पोहोच पावती असून भविष्यातही असेच अधिकाधिक उपक्रम राबवण्याचा आमचा मानस असेल.

