पुणे-महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा वापर थांबवा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनाच भेटून लेखी निवेदन देऊन केली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे अरविंद शिंदे,माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,शिवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे, आमदार बापू पठारे,माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, कमलताई व्यवहारे, वसंततात्या मोरे, रवींद्र माळवदकर, सुनिल माने, किशोर कांबळे, सुजित यादव, आसिफ शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,’ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. प्रभाग रचना व इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता होत असताना या सर्व प्रक्रियेत सत्ताधारी पक्षांचा, विशेषतः भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप अतिशय चिंतेची बाब आहे.
आपल्या पक्षासाठी सोयीचे ठरतील अशा प्रभागांची रचना करणे, राजकीय फायद्यासाठी शहरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रवृत्त करणे अशा अनेक मार्गाने भारतीय जनता पक्ष सक्रिय झाला आहे. या दुर्दैवी प्रकारात पुणे महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनातील काही घटकांचे सत्ताधाऱ्यांना सहकार्य मिळत आहे असा महाविकास आघाडीचा आरोप आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी आज पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली.
प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचा वाढता हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासनाने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल असा इशारा महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. तसेच, पुणे शहरातील विविध भागात हेतू पुरस्कार धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याची सत्ताधाऱ्यांची नीती आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेत पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी अशी मागणी ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

