पुणे – कोथरूड पोलिस ठाण्यात 3 दलित तरुणींचा छळ झाल्याच्या आरोपामुळे वातावरण तापले आहे. या तरुणींनी पोलिसांवर जातीवाचक शेरेबाजी, विनयभंग व शाब्दिक लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंबंधी पीडित मुलीने दिलेली तक्रार समोर आली आहे. त्यात या आरोपांचा उल्लेख आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, पीडित तरुणींनी आपल्या तक्रारीत पीएसआय कामठे, कॉन्स्टेबल शिंदे, सायबर पोलिस सानप यांच्यासह पिवळ्या रंगाचे चेक्सचे शर्ट घातलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा उल्लेख केला आहे. हे सर्व पोलिस कर्मचारी व निवृत्त पोलिस अधिकारी असलेले माझ्या मैत्रिणीचे सासरे आमच्या कोथरूड येथील फ्लॅटवर आले होते. त्यावेळी फ्लॅटमध्ये आम्ही दोघी मैत्रिणी होतो. त्यांनी घरात शिरताच झाडाझडती सुरू केली. आम्हाला दुपारी 3.30 वा. कोथरूड पोलिस ठाण्यात नेले. 7.30 वाजेपर्यंत आम्हाला पोलिस स्टेशनच्या वरच्या मजल्यावर बसवून ठेवण्यात आले. आम्हाला आमच्या विवाहित मैत्रिणीचा पत्ता विचारून मारहाण करण्यात आली. सुरुवातीला आम्ही काहीच सांगितले नाही. पण मारहाण सहन न झाल्याने अखेर आम्ही तिचा पत्ता सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लैंगिक शेरेबाजीही केली.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आम्हा तिघींनाही कोथरूड पोलिस स्टेशनच्या वरच्या मजल्यावरील एका रुममध्ये ठेवले. तिथे माझा 4 तास छळ झाला. यावेळी पोलिसांनी मला माझे आडनाव विचारले. तुझे आडनाव काय? मग तू अशीच वागणार असे पोलिस म्हणाले. यावेळी एक महिला पोलिस अधिकारी म्हणाली, की तुझा स्वभाव असाच राहिला, तर कुणीतरी तुला असेच मारून टाकेल. तुझा खून होईल. तू अशी जिवंत राहूच शकत नाहीस. त्यामुळे मी कुटुंबीयांपासून इथे लांब (पुण्यात) एकटी राहते. या धमकीमुळे मला आता सतत भीती वाटत आहे.
पीडित तरुणी आपल्या तक्रारीत पुढे म्हणते, एकट्या राहत अशाच मोकाट सुटल्यात. किती पोरांसोबत झोपते? तुझ्या रुमवर पोरं झोपायला येतात का? तुझी व तुझ्या मैत्रिणींची ओढणी एकाच रंगाची आहे. तुम्ही लेस्बियन दिसत आहात. तुम्हाला पाहूनच वाटत आहे की, तुम्ही एलजीबीटीक्यू समुदायाच्या आहात असे विविध आरोप करून माझे आळीपाळीने शाब्दिक लैंगिक शोषण करण्यात आले.
तुला बाप नाही. फक्त माय आहे. तू पगाराचे पैसे घरी देतेस का? की त्यांनीही तुला वाऱ्यावर सोडले आहे? पोलिसांनी चौकशीशी काहीच संबंध नसल्याची वाक्य बोलून मला टॉर्चर केले. यावेळी काही पुरुष पोलिस सतत माझे शरीर न्याहाळत होते. जणू काही ते डोळ्यांनी माझे शरीरच स्कॅन करत होते. महिला पोलिसही सतत निरीक्षण करत होत्या. एक पोलिस अधिकारी तर चक्क माझ्या अंगावर धावून आला. त्याचा हाता, खांद्याचा व हनुवटीचा घाणेरडा स्पर्श मला झाला. एका प्रकरणात केवळ चौकशीसाठी मला ठाण्यात आणले असता त्या पोलिस अधिकाऱ्याने मला गाल व पाठीवर गुद्दे व चापटा मारल्या. कंबर व पायावरही लाथा मारल्या, असा आरोपही सदर तरुणीने आपल्या तक्रारीत केल्याचा दावा ‘एबीपी माझा’ने आपल्या वृत्तात केला आहे.
कॉन्स्टेबल शिंदे यांनी माझ्या मोबाईलमधील फोटो पाहून, ‘मस्त मजा करते, ऐष करते’, अशी टिप्पणी केली. पोलिस वारंवार माझी जात विचारत होते. नाव सांगितले की हसायचे. एकाने शिवी दिली की इतरजण हसायचे. पोलिसांनी माझ्या मोबाईलमधील पर्सनल चॅटही वाचले. माझ्या व्हॉईसनोट ऐकल्या. दोन मित्रांसोबतचे चॅट वाचून, ‘या दोघांमधला तुझा बॉयफ्रेंड कोण?’ असेही पोलिसांनी विचारले. कोथरुड पोलिस ठाण्यात जवळपास चार तास माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला असा आरोप पीडित तरुणीने केला.
छत्रपती संभाजीनगर येथील एक 23 वर्षीय विवाहित महिला पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आली होती. ती तिथे आपल्या मैत्रिणींसोबत राहत होती. पुणे पोलिसांनी या मुलीला मदत करणाऱ्या 3 मुलींना कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतले. यावेळी त्यांना कोथरूड पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी रविवारी रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत आंदोलन केले.

