आयुक्त साहेब विसर्जन मिरवणूक सुरु कधी करायची ,मंडळाच्या विसर्जन रथांचा क्रम कसा असेल ..सामोपचाराने ठरवा हो
पुणे- पुण्याच्या गणेशोत्सवाची जागतिक पातळीवर ओळख आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीला दिशा देणारा उत्सव म्हणून लोकप्रिय झालेल्या उत्सवाने आता सामाजिक चळवळीचा वेध घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून यावे अशी दिशा मिळू लागणार आहे . हा उत्सव अगदी २ वर्षाच्या मुला पासून ते ९० वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटावा कोणालाही उपद्रवकारक वाटू नये यासाठी आता अधिक काळजी घेण्याचे प्रयत्न देखील सुरु झालेत . गुलालाची उधळण रोखली गेली,विना गुलाल मिरवणुकीचे प्रयत्नही बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याचे पूर्वीच पाहायला मिळालेत त्यानंतर आता कर्णकर्कशच नव्हे तर हृदयाला आणि कानांना इजा पोहोचविणारे DJ नकोतच आणि डोळ्यांना इजा पोहोचविणारे लेझर बीम देखील नकोत अशी भूमिका संदीप खर्डेकर , अंकुश काकडे आणि श्रीकांत शिरोळे आणि अनेकांनी व माध्यमांनी देखील गेल्या काही वर्षापूर्वीपासून मांडायला सुरुवात केली , पण DJ आणि लेझर बीम वर अद्याप म्हणावा तसा आवर घालता आलेला नसावा असे मानले जाते ,ते वापरणाऱ्यावर खटले भरले जातात .. पण त्यांना काहीही अर्थ नसतो . ती तेवढ्यापुरती कारवाई असते , नंतर हे खटले काढूनही घेतले जातात . त्यामुळे DJ आणि लेझर बीम नसावेतच या साठी पोलिसांनी काही भूमिका घेणे गरजेचे असल्याचे बोलले जाऊ लागले आहे . या शिवाय विसर्जन मिरवणूक जर २४ तासात संपवायची असेल तर ती सकाळी ७ वाजता सुरु करावी असा आग्रह हि आता धरला जातोय . मानाच्या गणपतींनी दिवसभर व्यतीत केल्यावर अन्य मंडळांना तेवढी स्पेस मिळत नाही हि खंत व्यक्त केली जाते . त्यात आता मनाच्या गणपती नंतर विसर्जन मिरवणुकीत भाऊ रंगारी आणि मंडई गणपतीने सहभागी होण्याची घोषणा केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रवक्ते असलेले संदीप खर्डेकर यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष म्हणून पोलीस आयुक्तांना एक पत्र देत मंडळांची बैठक बोलवा आणि सामोपचाराने सारे काही ठरवा असे आवाहन केले आहे. काय म्हटले आहे नेमके खर्डेकर यांनी या पत्रात ते वाचा जसेच्या तसे…..
प्रती,
मा. अमितेशकुमार,
पोलीस आयुक्त, पुणे…
विषय – गणेश विसर्जन मिरवणूकीतील गैरप्रकारांबाबत….
मा. महोदय,
मी गणेशोत्सवाशी 1983 सालापासून जोडलेला कार्यकर्ता असून आता चाळीस वर्षाहून जास्त काळ विविध मंडळाशी संबंधित आहे.
गणेशोत्सवाला आता जेमतेम वीस दिवस राहिलेत आणि विसर्जन मिरवणूकीतील मानाच्या गणपतींच्या नंतर च्या क्रमवारी वरून मतभेदाचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळाने मानाच्या गणपतीपाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर काही मंडळानी सकाळी सात ला मिरवणूक सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. तर काहींनी परस्पर केलेले घोषणेला विरोध दर्शविला आहे.या परिस्थितीत शहरातील प्रमुख गणेश मंडळाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व सार्वजनिक उत्सवांशी संबंधित शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक यांची तातडीने बैठक घेऊन याबाबत चे धोरण निश्चित करावे आणि ह्या विषयांवरून गणेशोत्सवाची शांतता भंग होऊ नये यासाठी सर्वांच्या सहमतीने सर्वमान्य धोरण निश्चित करावे अशी आग्रही मागणी करत आहे.
गतवर्षी मी, अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यासह अनेक पुणेकरांनी डीजे च्या वापरावर निर्बंध आणावेत यासाठी मोहीम उघडली होती. यावर्षी मध्यवर्ती भागातील मंडळाना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देणारे उद्योजक पुनीत बालन यांनी डीजे विरुद्ध घेतलेली भूमिका स्वागतार्ह असून यामुळे मोठा फरक पडेल असे दिसते.
यासह मिरवणूकीतील काही गैरप्रकारांबाबत पोलीस प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे आहे असे वाटते.
यात प्रामुख्याने…
1) मिरवणुकीतील डीजे आवाजाच्या पातळीवर आणि डोळ्यांना इजा करणाऱ्या लेझर बीम वर पोलीस खात्याने अंकुश ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आधीच मंडळाशी संवाद साधावा असे वाटते. कारणं ऐन मिरवणुकीत mob psychology मुळे आणि रस्त्यावर असलेल्या प्रचंड गर्दी मुळे पोलीस कारवाई करत नाहीत आणि नंतर दाखल केलेल्या खटल्यांना काहीच अर्थ उरत नाही.
2) बाहेरून मिरवणूक बघायला आलेली आणि शिक्षणासाठी आलेली काही मंडळी झुंडीने विविध मंडळापुढे नाचण्यासाठी उत्सुक असतात. ते कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते नसतात आणि त्यांच्यामुळे मिरवणूक रेंगाळते, यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
3) मुलांच्या, पुरुषांच्या अश्लील हावभाव करत केलेल्या नृत्यामुळे उत्सवाचे पावित्र्य भंग होतेच पण गेली काही वर्षे महिलांचा / मुलींचा मिरवणुकीत सहभाग वाढत असून त्यांच्यात देखील अश्लील हावभाव करत नाचणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, यावर देखील लक्ष ठेवणे गरजेचं आहे असं वाटतं.
4) सध्या पुणे शहरात बहुतांश नवे पोलीस अधिकारी नेमणूकीस आहेत. पुणेकरांना ओळखणारे आणि पुणेकर असलेले व मंडळाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता जाणणारे अधिकारी फारसे राहिले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन या महत्त्वाच्या उत्सवासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे पथक तयार करावे ही विनंती.
5) ढोल ताशा पथकातील वादक हे एका मंडळाचे विसर्जन झाल्यावर दुसऱ्या मंडळाच्या वादनासाठी लक्ष्मी रस्त्याने खांद्यावर ढोल घेऊन उलटे जाताना प्रचंड धक्काबुक्की करत जातात, तसेच वादन करताना देखील जोशात उड्या मारतात व टिपरू इतके उंचावतात की ते नागरिकांना लागतेच. त्याच बरोबर पथकातील वादकांची संख्या मर्यादित असावी याबद्दल देखील मार्गदर्शक सूचना द्याव्यात ही विनंती.
6) काही तथाकथीत पोलीस मित्र किंवा स्वयंसेवक हे प्रचंड दादागिरी करतात व फुकट फौजदारकी करताना महिलांना, लहान मुलांना,शहरातील प्रतिष्ठितांना देखील सोडत नाहीत व ह्यांच्या अरेरावी मुळे सगळेच त्रस्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ह्यांना देखील आवर घालण्याची आवश्यकता आहे याची दखल घ्यावी.
यासह वेळोवेळी अन्य उपयुक्त सूचना करेनच… तूर्त ह्या बाबतीत गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी ही विनंती.
आपलाच,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

