पुणे- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अपर पोलीस महासंचालक यांची नियमावली (SOP), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान सभेतील घोषणा या सर्वांचा आधार घेत मशिदींवरील भोंगे हटवा याबाबत लेखी निवेदन देण्यासाठी आज भाजप नेते किरीट सोमैया यांनी पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले .

वाचा त्यांचे लेखी निवेदन जसेच्या तसे …….
संदर्भः केएस/मुंबई/02/3805/2025
दि. 03 ऑगस्ट, 2025
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन
पुणे.
महोदय,
विषयः मशिदी वरील अनधिकृत भोंगे / लाऊड स्पीकर.
संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अपर पोलीस महासंचालक यांची नियमावली (SOP), मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस यांची विधान सभेतील घोषणा.
मुंबई उच्च न्यायलयाने जानेवारी 2025 मध्ये मशिदीवर (धर्मस्थानात) अनधिकृत भोंगे, लाऊडस्पीकर, ध्वनी प्रदूषण संबंधात अंतिम आदेश दिले. यात त्यांनी ध्वनी मर्यादा 50 डेसीबल पेक्षा अधिक असू नये यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितलं आहे की, “भोंगे चालणार नाही”.
मुंबई मध्ये भोंगा मुक्त मुंबई मोहीम यशस्वी रित्या मुंबई पोलीसांनी पार पाडली.
महाराष्ट्रात आपल्या भागात मोठ्या प्रमाणात मशिदीवर अनधिकृत भोंगे आहेत. ध्वनी प्रदूषण पण तीव्र आहे. अनेक मशिदच्या ट्रस्टींनी लाऊडस्पीकर / भोंग्याची परवानगी घेतलीच नाही. ध्वनी मापक यंत्रही बसवले नाही.
मशीद आणि मदरसा परवानगी न घेता किंवा मिळालेल्या परवानगीचे निर्देश न पाळता मोठ्या प्रमाणात आपल्या भागात लाऊडस्पीकर, भोंगे वाजवत आहे, दिवसा 4/5 वेळा अश्या प्रकाराने गोंगाट होतो हे महाराष्ट्रातील जनतेला, न्यायालयाला, महाराष्ट्र अपर पोलीस महासंचालक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आम्हाला मान्य नाही.
- काही पोलीस अधिकारी आम्ही परवानगी दिली नाही असे सबब दाखवून कारवाई करत नाही.
- वास्तविकरीत्या ध्वनी प्रदूषणची मर्यादा, ध्वनी आवाज यांच्या मर्यादेत भोंगे बसूच शकत नाही. एवढ्या उंचीवर, खुल्या आकाशात बाहेरच्या जनतेसाठी भोंगे, लाऊडस्पीकर लावणे हे कायद्यात बसतच नाही,
- हे बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही अनेक पोलीस स्टेशनचे अधिकारी कारवाई करत नाही याची गंभीर दखल घ्यावी लागणार.
- काही पोलीस अधिकारी आम्ही डेसीबल मोजतो हे सांगतात त्यावेळी हे सत्य नसते, कारण एवढ्या उंचीवरून, मीनाऱ्यावरून त्या लाऊडस्पीकर / भोंग्याच्या तोंडाशी धरून जे ध्वनीवर्धक माप घ्यावे लागते, ते घेता येत नाही, हे शक्यच नाही.
- पोलीस कॉन्स्टेबल हे मशिदी/ मदरसाच्या समोरच्या फुटपाथ वरून, लांबून काही वेळेला माप घेतात आणि रिपोर्ट देतात हे फक्त चुकीचं नाही तर बेकायदेशीर आहे हे स्थानिक पोलीसांनी लक्षात ठेवावे लागणार.
- आपल्या भागातील सगळ्या मशिद, मदरसावरवर जर लाऊडस्पीकर, भोंगे असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करणे हे बंधनकारक आहे.
- कोणत्याही मशिद (धर्मस्थानक) यांना परवानगी हवी असल्यास 10 X 15 इंच बॉक्स स्पीकरची परवानगी देता येते ही परवानगी तिथे येणाऱ्या त्यांच्या भक्तांना व्यवस्थित ऐकायला जावे त्यासाठी दिली जाते त्याचे तोंड हे आतल्या बाजूला असणे बंधनकारक आहे.
आपण यासंबंधात ताबडतोब कारवाई करावी. आपल्या भागातील मदरसा, मशिदीवरील अनधिकृत भोंगे/लाऊडस्पीकर ताबडतोब काढण्यात यावे ही विनंती.
न्यायालयाचा अवमान आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणे तसेच पोलीस महासंचालक यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे हे मान्य नाही.
धन्यवाद !
आपला,
(डॉ. किरीट सोमैया)



