उरळी कांचन, – क्विक हील फाउंडेशन आणि एसपी कॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा” या उपक्रमांतर्गत गुरुकुल भक्तिवेदांत येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देत सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या. विशेषतः सोशल मिडिया, ऑनलाइन गेमिंग, फिशिंग लिंक, पासवर्ड सुरक्षा यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या सत्राद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सायबर हल्ल्यांची परिणामकारकता आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यांची जाणीव करून देण्यात आली. तसेच, सायबर सुरक्षिततेसाठी काही महत्त्वपूर्ण टिप्सही दिल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरला.

