सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सत्कार
पुणे : भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवकेंद्रीत आहेत. माणूसपण आणि सेवेतून समर्पण या भावनेतून बाबासाहेब शिंदे संविधानाशी सुसंगत भूमिका घेऊन समाजकार्य करीत आहेत, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
मनोहर कोलते मैत्र संघ, पुणे, नवरत्न ओल्ड एज होम आणि स्नेहछाया परिवार बालकाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 3) महावितरणमधील प्रधान यंत्रचालक बाबासाहेब शिंदे यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महावितरण मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार, मनोहर कोलते, आर. टी. देवकांत, अनिता राकडे, दत्तात्रय इंगळे मंचावर होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांची पगडी, शाल देऊन शिंदे यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, शिंदे यांची भूमिका संघर्षाची असली तरी विचार संवादी आहेत. संवेदनेमुळे बोलण्यात आलेले कौशल्य अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले आहे. त्यांच्या सेवाकार्याची साक्ष अनेक उदाहरणांमधून दिसून येत आहे.
राजेंद्र पवार म्हणाले, शिंदे यांनी मैत्रीभाव जपत सहकारी, मित्रांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्यातील विनम्रता हा सहकारी आणि मित्रांमधील खरा दुवा आहे.
पुस्तकांची उपयुक्तता लक्षात घेऊन ज्या शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले अशा शाळांना, नवरत्न वृद्धाश्रम, स्नेहछाया बालकाश्रमास पुस्तके भेद दिली. वाचनातून मनुष्य घडत जातो त्यामुळे विविध संस्था, शाळांना पुस्तके भेट देत असल्याचे बाबासाहेब शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. आर. टी. देवकांत यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनोहर कोलते म्हणाले, शिंदे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेतली जावी या उद्देशाने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेब शिंदे यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत थेटे यांनी केले.

