पुणे :
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सरदार महादेव बळवंत नातू सभागृह (सेनापती बापट रस्ता) येथे सादर झालेला ‘गीत अथर्वशीर्ष’ कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.पारंपरिक गणपती अथर्वशीर्षाच्या पठणाला नवा कलात्मक आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात, कवी मधुकर जोशी यांच्या अथर्वशीर्षातील ऋचांवरील अर्थगर्भ कवितांना पं. कमलाकर जोशी यांनी सुरेल स्वरबद्धता दिली. मराठी भाषेतील प्रासादिक काव्य, रागदारी संगीत आणि भरतनाट्यम नृत्य यांचा त्रिवेणी संगम रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला.गणेशाची शब्द आणि नृत्यरूपे या कार्यक्रमातून प्रकट झाली आणि रसिक भारावून गेले.
शांती मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.गायन शुभदा आठवले आणि संपदा थिटे यांनी अत्यंत भावपूर्ण रीतीने सादर केले. डॉ. मीनल कुलकर्णी यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली यशदा, समा, जान्हवी आणि शांभवी यांनी भरतनाट्यम शैलीत सादर केलेले नृत्य नेत्रसुखद होते. स्वराली गोखले यांनी प्रभावी निवेदन केले.संगीताची साथसंगत वेधा पोळ (व्हायोलिन), पवन झोडगे (पखवाज), जयेश शेंबेकर (तबला) आणि प्रवीण ढवळे (टाळ) यांनी केली. केदार अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे नेटके व्यवस्थापन पाहिले. श्रेया, ऋचा, प्रज्ञा, नीता आणि केतकी यांनी समूहस्वरातून सादरीकरणात रंग भरले.
हा सांस्कृतिक प्रसार मालिकेतील २५५ वा कार्यक्रम होता.उपस्थित प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमास दिलेली भरभरून दाद हेच यशाचे खरे प्रमाण असल्याचे मत भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी व्यक्त केले.भारतीय विद्याभवन च्या पुणे केंद्र समितीचे ज्येष्ठ सदस्य ग्रुप कॅप्टन सुहास फाटक व प्रा. नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा प्रमाणपत्र व ज्ञानेश्वरी प्रत देऊन सत्कार करण्यात आला

