शेतकरी हित जपण्याचा फॅक्ट संस्थेचे आवाहन
पुणे:उलाढालीच्या निकषावर कृषी उत्पन्न बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या घोषित करण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ आणी संवेदनशील व्यवस्थापन अंगीकारले तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती चे उत्पन्न ३०० पटीने वाढणे शक्य आहे, असे म्हणणे फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अँड ट्रेड (फॅक्ट ) या संस्थेने आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मांडले आहे.फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अँड ट्रेड (FACT) चे अध्यक्ष किशोर कुंजीर यांनी आज हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
राज्य शासनाच्या व्हिजन २०४७(Vision 2047) च्या धर्तीवर येत्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे प्रस्तावित आहे. कृषि हा त्यातील एक महत्वाचा विभाग असेल. सहाजिकच, कृषि पणन नीती, हि शेती आणि संलग्न अर्थव्यवस्थेसाठी अनन्यसाधारण महत्वाची असणार आहे.महाराष्ट्रातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आर्थिक उलाढालीच्या निकषांप्रमाणे प्रथमतः ५ ते ७ बाजार समित्या राष्ट्रीय म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे, नूतन धोरणांप्रमाणे राष्ट्रीय बाजार समित्यांमध्ये २ जागा व्यापारी प्रतिनिधींना आणि १ जागा अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राखीव असण्याची शक्यता आहे. समस्त शेतकरी वर्गाला योग्य बाजारभाव मिळवून देणे हे कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे मुलभूत उद्दिष्ट असल्याबरोबरच ते साध्य करताना बाजार आवारातील सर्व मुलभूत घटक जसे की, आडत्या, व्यापारी, खरेदीवार, कामगार, वाहतूकदार अशा सर्वांना एकत्रित घेऊन शेतीमाल विक्री व्यवस्थापनासाठी योग्य ती पावले उचलणे, बदलत्या व्यापाराच्या गरजांच्या अनुषंगाने कृषि पणन व्यवसाया सापेक्ष अद्ययावत सुविधा पुरविणे, हे संचालक मंडळाचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, काही अपवाद वगळता आजतागायत संचालक मंडळ अथवा त्या त्या वेळेचे शासन नियुक्त प्रशासक यांना शेतकरी हिताच्या दुष्टिने फार काही विशेष साध्य झाल्याचे दिसून येत नाही,असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती उत्कृष्ट रीत्या कार्यरत असण्यासाठी शेतीसोबतच प्रामुख्याने शेतमाल विपणनाचे सखोल शास्त्रीय ज्ञान, माहिती, अनुभव आणि सर्वंकष जाण जाणीव असणारे अभ्यासू संचालक बाजार समितीवर नसल्याने तसेच समस्त शेतकरी वर्गाची कोणालाही काहीही फिकीर नसल्याने एक अत्यंत महत्त्वाची तसेच जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक्तेतील एक समाजोपयोगी संस्था/ प्रभावी माध्यम प्रत्यक्षांत मात्र खात्रीशीर रीत्या शेतकरी हिताविरोधातच कार्यरत असल्याचे दिसते.
पुणे बाजार समितीमध्ये, शेतीमाल नियमन आणि विपणन सोडून अन्य बाबीनाच फक्त आणि फक्त प्राधान्य दिले जात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. शेतकरी हित आणि व्यवसाय वृद्धी बाजूला राहून सातत्याने संचालक मंडळ आणि प्रशासक यांचा दुर्दैवी खो -खो सुरु असल्याबरोबरच असंवेदनशील संचालकांच्या विळख्यातून बाजार समिती काढून घेऊन व्यावसायिक ज्ञान असणाऱ्या तज्ञ जाणकारांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज केल्यास, आजही या बाजार समितीचे गत वैभव पुनश्चः एकवार प्रस्थापित होऊन पुणे बाजार समिती ही शेतकरी आणि व्यापाऱ्यांची प्रथम पसंतीची बाजारपेठ असू शकेल,असा विश्वास या पत्रकात व्यक्त केला आहे.
चिंतेची बाब म्हणजे, कदाचित पुणे बाजार समिती हि देशातील एकमात्र बाजार समिती असू शकेल ,जिथे गेल्या पंचवीस वर्षात येधील व्यापार उत्तरोत्तर वाढण्याऐवजी कमी होऊन आजमितीस अक्षरशः २० से २५ टक्के व्यापार राहिला आहे. पर्यायाने, बाजार समितीच्या सदोष व्यवस्थापनामुळे शेतकरी वर्गाचे कधीही भरून न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे आणि आजतागायत होते आहे. प्रामाणिक आडत्यांव्यतिरिक्त प्रत्यक्षात याबाबत मूलतः संचालक आणि पर्यायाने अधिकारी अशा सर्वांचीच अनास्था आहे. केंद्र शासन प्रस्तावित नीती आयोग निर्देशित व्यवस्थापनासंबंधी नूतन धोरणे निश्चित करताना जर अभ्यासू व्यापारी संचालक तसेच शेतकरी संचालकांची क्षमता आणि योग्यता पारखून नियुक्ती झाल्यास, व्यावसायिक आडाख्यांनुसार बाजार समितीतील सेवा सुविधा सुधारून, कृषि उत्कर्ष साधण्याबरोबरच ‘शेतकरी- आडत्या -व्यापारी यांचा सुनियंत्रित समन्वय’ हा केंद्रबिंदू मानून सद्य आर्थिक स्थिती तसेच भविष्यातील पोषक वित्तीय धोरणांन्वये सर्व पैसा प्रामुख्याने बाजार आवारासाठी आणि अनुषंगिक बाबीसाठीच विवेकबुद्धिने काटेकोरपणे वापरल्यास आजही पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीची उलाढाल किमान ३०० पटीने वाढविणे तसेच बाजार समितीचे उत्पन्नात ३०० कोटीपर्यंत वाढ साध्य होणे लीलया शक्य आहे, असा खात्रीशीर विश्वास फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अँड ट्रेड (FACT) ने व्यक्त केला आहे.
प्राप्त निधी आणि उपलब्ध सोयी सुविधांचे योग्य नियोजन व्यापार समृध्दी साठी केले तरच इतिहासाची पुनरावृत्ती न होता, बळीराजाचे पुणे बाजार समितीला विपणनासाठी प्राधान्य आणि अनमोल आशीर्वाद प्राप्त होणे, शक्य आहे.राष्ट्रीय बाजार समितीच्या प्रक्रियेला सहेतुक विलंब होण्याची वदंता देखील ऐकिवात आहे. परंतु, सुदैवाने सध्या महाराष्ट्राला दूरदर्शी, सर्वसमावेशक असे अभ्यासू मुख्यमंत्री, कृषि विषयक जाणिव असलेले तसेच कोणतेही काम हाती घेतले की जिद्दीने पूर्ण करणारे अशी ख्याती असलेले पालक मंत्री लाभले आहेत त्यामुळे, कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे चे ग्रहण सुटून भाग्योदय होईल, अशी आशा वाटते, असे या पत्रकात म्हटले आहे.

