पुणे-दौंड तालुक्यातील यवत येथे दोन गटांत जातीय तणाव निर्माण झाला आहे. व्हॉट्सॲपवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे हा वाद भडकला. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही थेट घटनास्थळी स्थितीचा आढावा घेतला.
यासंबंधीच्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील यवत गावातील एका समुदायाच्या तरुणाने शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली. या पोस्टची माहिती मिळताच गावात तणाव निर्माण झाला. त्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास यवतचा आठवडी बाजार बंद करण्यात आला. यावेळी एका गटाच्या लोकांनी काही दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण स्थिती उद्भवली. यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, आक्षेपार्ह तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. सध्याचा तणाव पाहता गावात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण यवतच्या सहकार नगर भागात राहतो. पोस्टनंतर संतप्त जमावाने त्याच्या घराची तोडफोड केली. यावेळी काही लोकांनी एका धार्मिक स्थळावर दगडफेकही केली. यामुळे तणाव वाढला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे गत शनिवारी 26 जुलै रोजी यवतच्या नीळकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा कथित अवमान झाला होता. या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव काहीसा निवळला होता. पण त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यामुळे येथील तणावात मोठी वाढ झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) संदीप गिल यांनी यवतच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी पोलिसांना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ते निर्देश दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. या घटनेनंतर काही लोक एकत्र जमल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. पण पोलिसांच्या आवाहनानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. सध्या गावात कोणताही तणाव नाही. आमची पेट्रोलिंग येथे सुरू आहे.
या घटनेत काही दुचाकी व दुकानांची जाळपोळ करण्यात आली. पण पोलिस अधीक्षकांनी जाळपोळ झाल्याचा दावा फेटाळला. त्याला जाळपोळ म्हणता येत नाही. काही ठिकाणी काचा फुटल्यात. संतप्त जमाव एक-दोन ठिकाणी गेला होता. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना शांततेचे आवाहन केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. येथील स्थिती निवळली आहे, असे ते म्हणाले.
भाजपचे वादग्रस्त आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात काल यवतमध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. हा तणाव आज दुसऱ्या दिवशीही कायम होता. त्यातूनच आजची घटना घडल्याचा दावा केला जात आहे. दौंडचे आमदार राहुल कूल यांनी याविषयी बोलताना सांगितले की, यवतमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. सर्वांशी संवाद साधून हा तणाव निवळण्याचा प्रयत्न सुरू होता. सध्या तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवत येथील परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, मी एका कार्यक्रमात होतो. आताच मी यवतच्या प्रकरणाबाबत माहिती घेतली. त्या ठिकाणी एका बाहेरच्या व्यक्तीने चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. कोणत्यातरी पुजाऱ्याने बलात्कार केला वैगेरे अशा आशयाचे स्टेटस ठेवण्यात आले होते. यामुळे लोक रस्त्यावर आले. जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
सध्या दोन्ही समाजाची लोक एकत्र बसले आहेत. तणाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणी तणाव उत्पन्न होईल अशी घटना घडली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ज्या भागात कधी जातीय तणाव झाला नाही, तिथे आता तणाव निर्माण झाला आहे. राजकीय हितासाठी सध्या महाराष्ट्राचे आरोग्य खराब करण्याचे काम सुरू आहे. हे अतिशय निंदणीय आहे. तणाव शांत करण्याचे काम पुढाऱ्यांचे असते. पण सध्याचे पुढारी स्वतःच जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

