पुणे- १६ जुलै:सायबर सुरक्षेच्या वाढत्या धोक्याविषयी जनजागृती करण्यासाठी Quick Heal Foundation आणि SP College, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या विशेष उपक्रमांतर्गत सुर्योदय वृद्धाश्रमात एक सायबर सुरक्षा जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. हे सत्र विशेषतः एकटे राहणाऱ्या आजी-आजोबांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात आले.
हे सत्र ईशा जोशी आणि अवंती दळवी या दोघींनी संयोजित आणि मार्गदर्शित केले. त्यांनी सायबर गुन्हेगारीच्या विविध प्रकारांवर—जसे की बँकिंग फसवणूक, बनावट फोन कॉल्स, आणि ऑनलाईन स्कॅम्स—सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत माहिती दिली. तसेच अशा प्रकारच्या सायबर धोख्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
या उपक्रमात युवा स्वयंसेवकांचा सहभाग विशेष होता. ईशा आणि अवंती यांनी केवळ माहिती दिली नाही तर आजी-आजोबांशी प्रेमाने संवाद साधत त्यांच्यासोबत वेळही घालवला. त्यामुळे सत्र अधिक आनंददायी आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध ठरले.
या सत्राचा परिणाम अत्यंत सकारात्मक होता. अनेक वृद्धांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, आता मोबाईल व डिजिटल माध्यमांचा वापर करताना त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तरुण पिढीने दिलेल्या प्रेम आणि संवादामुळे त्यांना जिव्हाळ्याची जाणीव झाली.
या उपक्रमातून सायबर सुरक्षेविषयी जागरूकता तर निर्माण झालीच, पण त्याचबरोबर समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती आपली जबाबदारीही अधोरेखित झाली—ती म्हणजे सुरक्षितता आणि आपुलकीचा आधार देणे.

