पुणे-काही पुरस्कार व्यक्तीची प्रतिष्ठा वाढतात, तशीच माझी प्रतिष्ठा वाढवणारा पुरस्कार मला मिळाला असल्याबद्दल अतिशय आनंद झाला असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्रनिर्माणातल्या भरीव योगदानासाठी दिला गेला आहे. टिळक स्मारक मंदिरात पुरस्काराचे वितरण झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक उपस्थित होते.
पुणे ते मुंबई अंतर केवळ दीड तासात
देशात पैशाची किंवा टेक्नॉलॉजीची कमतरता नाही. मात्र, देशासाठी काम करणाऱ्यांची कमतरता असल्याची खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. मुंबईपासून बंगलोर पर्यंत आपण नवा महामार्ग तयार करत असून या महामार्गामुळे पुणे ते मुंबई अंतर केवळ दीड तासात पोहोचणे शक्य होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. माझ्या विभागाकडे भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा पडलेला आहे. मात्र तो खर्च करणारेच नसल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
राजकारणाला न पटणारे सत्य नितीन गडकरी बोलतात – देवेंद्र फडणवीस
राजकारणात सत्य माहिती असून देखील ते बोलू नये, असे मानले जाते. कारण अनेक वेळा त्या सत्य बोलल्याने आपलेच नुकसान होत असते. मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की, नितिन जी हमखास सत्यच बोलतात. कितीही नुकसान झाले तरी नितीनजी तेच बोलतात, जे त्यांच्या मनात आहेत. ते कधीच सोयीचे किंवा राजकारणाला जे पटेल ते बोलणार नाहीत. त्यांच्या मनात जे आहे, ते तेच बोलतील. त्यांचा हाच स्पष्टवक्तेपणा लोकांना जास्त मनापासून आवडतो, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अजित पवार आणि नितीन गडकरी यांच्यात एक साम्य – देवेंद्र फडणवीस
कुठेही नवीन कन्स्ट्रक्शन झाले की, गडकरी आणि अजित पवार हे पाहणी करण्यासाठी जातात. मात्र, त्या ठिकाणी या कामात काय चुकले? ते हे दोघेही शोधून काढतात. अशा शब्दात फडणवीस यांनी नितीन गडकरी आणि अजित पवार यांच्यात हे सामन्य असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर संबंधित अधिकाऱ्यांची सर्वासमक्ष खरडपट्टी काढतात. कोणतेही काम गुणवत्ता पूर्णच असायला हवी, असा त्यांचा मानक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
गडकरी हे केवळ यशस्वी राजकारणीच नाही, तर प्रयोगशील शेतकरी, दूरदृष्टी असलेले उद्योजक, प्रभावी प्रशासक आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते –अजित पवार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि,’ लोकमान्य टिळक हे परखड विचारसरणीचे, राष्ट्रसेवेच्या निष्ठेनं झपाटलेले आणि निर्णायक भूमिका घेणारे महान नेते होते. त्यांच्या नावानं आणि त्यांच्या परिवाराकडून दिला जाणारा हा राष्ट्रीय सन्मान यंदा गडकरी साहेबांना देण्यात येतोय, ही अत्यंत सार्थ अभिमानाची बाब आहे. या पुरस्काराच्या गौरवशाली परंपरेत याआधी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हा सन्मान प्राप्त झाला होता. त्यामुळं या पुरस्काराची प्रतिष्ठा आणि भारदस्त परंपरा अधोरेखित होते.
नितीन गडकरी हे केवळ यशस्वी राजकारणीच नाही, तर प्रयोगशील शेतकरी, दूरदृष्टी असलेले उद्योजक, प्रभावी प्रशासक आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशात रस्ते विकासाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडले आहे. ‘भारतमाला’ उपक्रमाअंतर्गत ८३,००० कि.मी. पेक्षा अधिक रस्त्यांचं जाळं निर्माण होत आहे. फास्टटॅग, इंधनात इथेनॉलचा वापर, प्लास्टिकच्या पुनर्वापरातून रस्ते बांधणी यांसारख्या अनेक धोरणात्मक सुधारणा त्यांनी रस्ते व वाहतूक क्षेत्रात यशस्वीपणे राबवल्या आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळं ट्रान्सपोर्टेशन अधिक स्वस्त, वेगवान आणि पर्यावरणपूरक बनले आहे.
गडकरी साहेबांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला विशेष लाभ मिळाला. राज्यातील रस्ते प्रकल्पांना अधिक गती मिळाली, अनेक राज्य मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गांमध्ये करण्यात आलं आहे. त्यांच्या कार्यामुळं महाराष्ट्राची दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. त्यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ मिळाल्याचा आम्हा सर्व पुणेकर आणि महाराष्ट्रवासीयांना अभिमान आहे.

